Pune: मुलाची दारू सोडविण्यासाठी बंगाली तांत्रिक बाबाला दिले ९६ हजार; बाबा पैसे घेऊन फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 07:19 PM2022-03-16T19:19:41+5:302022-03-16T19:19:54+5:30
मुलाची दारू सोडविण्याकरिता दिलेले ९६ हजार रुपये घेऊन बंगाली तांत्रिक बाबाने पोबारा केला आहे
राजगुरूनगर : मुलाची दारू सोडविण्याकरिता दिलेले ९६ हजार रुपये घेऊन बंगाली तांत्रिक बाबाने पोबारा केला आहे. याबाबत प्रभाकर भिकाजी कौदरे (वय ६५ रा. राजगुरुनगर ता खेड ) यांनी एका बंगाली बाबा विरुध्द खेडपोलिस फसवणुकीची फिर्याद दिली आहे.
याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि २ मार्च रोजी पंचायत समिती समोरील रस्त्याने एक व्यक्ती मिया बंगाली साबरी अशा नावाचे कार्ड फिर्यादीच्या हातात देऊन गेला होता. त्यावरील मोबाईल नंबरवर फिर्यादी कौदरे यांनी संपर्क साधून माझ्या मुलाला दारूचे व्यसन आहे .त्यांची दारू सोडवायची आहे. तुम्ही कुठे राहता असे विचारले. त्यावर बंगाली बाबाने सांगितले की, चांडोली येथील सरकारी दवाखान्याच्या बाजुला मी राहण्यास आहे. त्यानंतर फिर्यादी कौदेरे यांनी मिया बंगाली बाबाची भेट घेऊन माझ्या मुलाला पाच वर्षापासुन दारूचे व्यसन जडले आहे. ते सोडविण्यासाठी काहीतरी प्रयत्न करा असे सांगितले. दरम्यान बंगाली बाबाने कौदेरे यांना सांगितले . तुमचा मुलगा २१ दिवसात दारू सोडेल, त्यासाठी मला ९६ हजार रुपये द्यावे लागतील. यावर कौदेरे यांनी विश्वास ठेवून पैसे बाबाला दिले. दरम्यान कौदेरे यांच्या मुलाने दारू सोडली नव्हती, तो अजुन दारुच्या आहारी गेला होता. त्यानंतर १५ मार्च रोजी कौदेरे व त्यांची पत्नी मिया बंगाली बाबाची भेट घेण्यासाठी गेले असता चांडोली येथून मागील पाच दिवसापुर्वीच बाबा येथे राहण्यास नाही असे शेजारील नागरिकांनी सांगितले. कार्डवरील मोबाईल बंद असल्याने कौदेरे यांची फसवणुक झाल्याचे लक्षात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस खेड पोलिस करित आहे.