डिंभे धरणात ९७.०६ टक्के पाणीसाठा, पाण्याचे नियोजन करताना प्रशासनाचा लागणार कस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 01:52 PM2023-11-02T13:52:42+5:302023-11-02T13:56:57+5:30
मागील वर्षी याचवेळी धरण १०० टक्के भरले होते....
- विलास शेटे
मंचर (पुणे) : पावसाळ्यात आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरण १०० टक्के भरले होते. सध्या पावसाने दिलेली ओढ तसेच उष्णतेमुळे होणारे बाष्पीभवन यामुळे डिंभे धरणात सध्या ९७.०६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याचवेळी धरण १०० टक्के भरले होते.
आंबेगाव तालुक्यासह जुन्नर, शिरुर, नगर, पारनेर भागासाठी वरदान ठरलेल्या डिंभे धरण (हुतात्मा बाबू गेनू जलाशय) यावर्षी १०० टक्के भरले होते. जून, जुलै महिन्यात फारसा पाऊस पडला नाही. ऑगस्टमध्ये सरासरी पाऊस पडला. तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यात पडलेल्या पावसामुळे डिंभे धरण कसेबसे भरले; मात्र इतर वर्षापेक्षा पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. मागील वर्षी १४९० मिलिमीटर पाऊस पडला होता. तर यावर्षी धरणक्षेत्रात केवळ ७५१ मिलिमीटर पाऊस पडला आहे. यावरून पावसाचे कमी प्रमाण लक्षात येते. परतीच्या पावसाने यावेळी फारशी हजेरी लावली नाही. नवरात्रोत्सवाच्या काळात चांगला पाऊस पडेल अशी आशा होती; मात्र त्यावेळी पाऊस पडला नाही.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात तसेच शिरुर तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे ऐन पावसाळ्यातही धरणातून कालव्यांद्वारे पाचशे क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात होता. हे सोडण्यात आलेले पाणी तसेच ऑक्टोबर महिन्यात असलेला उन्हाचा कडाका यामुळे धरणातील पाण्याच्या झालेल्या बाष्पीभवनामुळे पाणीसाठा होत आहे. आतापर्यंत धरणातील तीन टक्के पाणी कमी झाले आहे. यावर्षी धरण भरल्यानंतर घोडनदीत पाणी सोडण्यात आले; मात्र ते खूपच कमी दिवस सोडले गेले. पावसाचा रंगारंग पाहून धरणातील पाणी सोडणे लवकरच बंद केले गेले. मागील वर्षापेक्षा खूपच कमी पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे घोड नदीपात्रात अपेक्षित पाणी सध्या नाही. परिणामी धरणातून लवकरच घोड नदीला पाणी सोडावे लागणार आहे. मागील वर्षीची तुलना करता गेल्यावर्षी या वेळेला धरणात १०० टक्के पाणीसाठा शिल्लक होता; मात्र आजमितीला ९७ टक्के पाणीसाठा धरणात शिल्लक असून तीन टक्के पाणीसाठा कमी झाल्याने चिंता वाढू लागली आहे.
मागील वर्षी १४९० मिलिमीटर पाऊस पडला होता तर यावर्षी केवळ ७५१ मिलिमीटर पाऊस पडला आहे. दुष्काळाच्या झळा आताच जाणवू लागल्या असून डिंभे धरणातून वर्षभर वेळोवेळी पाणी सोडण्याची मागणी सर्वच भागातून होणार आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन करताना प्रशासनाचा कस लागणार आहे. धरणातून तसेच कालव्यामधून होणारी पाण्याची गळती हा एक कळीचा मुद्दा असून त्यामुळेही पाणी वाया जाते. दुष्काळी परिस्थिती, यावेळी पडलेला कमी पाऊस, वाढलेल्या उष्णतेने धरणातील पाण्याचे होणारे बाष्पीभवन पाहता वर्षभर पाणीसाठा टिकून राहण्यासाठी योग्य नियोजन करावे लागणार आहे.