कार्तिकी एकादशी विशेष बससेवेमधून पीएमपीला ९८ लाखांचे उत्पन्न; तब्बल ७ लाख प्रवाशांनी घेतला लाभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 13:31 IST2024-12-05T13:30:24+5:302024-12-05T13:31:17+5:30
पीएमपीकडून नोव्हेंबर महिन्यात दि. २४ ते २९ दरम्यान एकूण ३४३ बस सोडण्यात आल्या होत्या

कार्तिकी एकादशी विशेष बससेवेमधून पीएमपीला ९८ लाखांचे उत्पन्न; तब्बल ७ लाख प्रवाशांनी घेतला लाभ
पुणे : आळंदी येथील कार्तिकी एकादशी उत्सव आणि संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) कडून यात्रेकरूंच्या सोयीसाठी विशेष बससेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यातून पीएमपीला ९८,८७,१२२ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. या सेवेचा एकूण ७,४०,३१८ प्रवाशांनी यात्रा बससेवेचा लाभ घेतला आहे, अशी माहिती पीएमपी प्रशासनाने दिली.
पीएमपीकडून नोव्हेंबर महिन्यात दि. २४ ते २९ दरम्यान एकूण ३४३ बस सोडण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये ११४ नियमित बस आणि २२९ अतिरिक्त बसचा समावेश होता. तसेच या कालावधीत आवश्यकतेनुसार मध्यरात्री बससेवा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आळंदी येथे दरवर्षी होणाऱ्या या धार्मिक सोहळ्यासाठी लाखो भाविक उपस्थित राहतात. त्यांना सोयीस्कर आणि सुलभ प्रवासासाठी पीएमपीकडून दरवर्षी अशा विशेष सेवा पुरवल्या जातात. यंदाच्या यशस्वी आयोजनामुळे पीएमपी प्रशासनाने भाविकांचे आभार मानले असून, भविष्यातही अधिक चांगल्या सुविधा देण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.
पीएमपी प्रशासनाला मिळालेले उत्पन्न आणि प्रवासी
एकूण उत्पन्न - ९८ लाख ८७ हजार १२२ रुपये.
एकूण प्रवासी संख्या - ७ लाख ४० हजार ३१८