सामूहिक सोहळ्यामध्ये ९९ जोडपी विवाहबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 01:12 AM2018-02-08T01:12:23+5:302018-02-08T01:12:28+5:30
संत निरंकारी मिशनच्या वतीने महाराष्ट्राच्या ५० व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची सांगता झाल्यानंतर समागम स्थळावरच खारघर, नवी मुंबई येथे सद्गुरु माता सविंदर हरदेवजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात आयोजिलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये ९९ जोडपी विवाहबद्ध झाली.
हडपसर : संत निरंकारी मिशनच्या वतीने महाराष्ट्राच्या ५० व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची सांगता झाल्यानंतर समागम स्थळावरच खारघर, नवी मुंबई येथे सद्गुरु माता सविंदर हरदेवजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात आयोजिलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये ९९ जोडपी विवाहबद्ध झाली. यामध्ये पुण्यातील वधू वरांचाही समावेश आहे.
वधू-वरांपैकी ४० वर आणि ४१ वधू मुंबईतील होत्या, तर ४४ वर आणि ४६ वधू महाराष्ट्राच्या अन्य भागातून आल्या होत्या. १४ वर आणि ११ वधू देशाच्या विविध राज्यांतील होत्या. ज्यामध्ये दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, झारखंड, हरियाना, मध्य प्रदेश, पंजाब, चंदीगड, राजस्थान आणि आसाम या राज्यांचा समावेश आहे. एक वर आणि एक वधू यू. एस. ए. वरून आले होते. शैक्षणिक व व्यवसाय या दृष्टिकोनातून पाहिले असता ३१ वर आणि २५ वधू पदवीधर आहेत. तर ५ वर आणि ११ वधू पदव्युत्तर पदवीधर आहेत. यातील वरांपैकी ६ इंजिनिअर व २ एमबीए आहेत, तर वधूंमध्ये २ इंजिनिअर, २ डॉक्टर व २ एमबीए आहेत. विशेष म्हणजे १८ वर व १३ वधू मिशनच्या बाहेरून आलेले होते. याचा अर्थ ३१ कुटुंबांनी संत निरंकारी मिशनच्या साध्या विवाह पद्धतीला पसंती दर्शवली. ३ वधू व ३ वर पुनर्विवाह करीत आहेत.
विवाह सोहळ्याचा प्रारंभ निरंकारी मिशनच्या पारंपरिक ‘जयमाला’ आणि ‘सामायिक हार’ परिधान करण्याने झाला. त्यानंतर मधुर संगीताच्या चालीवर पवित्र मंत्रांच्या रुपात असलेल्या ४ ‘निरंकारी लावां’चे (मंगलाष्टका) गायन करण्यात आले. प्रत्येक ‘लावां’च्या शेवटी सद्गुरु माताजी व उपस्थित भाविक-भक्तगणांनी वधू-वरांवर पुष्पवर्षाव केला.
सद्गुरु माता सविंदर हरदेवजीमहाराज यांच्या आशीर्वचनाने हा मनोहर सोहळा झाला. सद्गुरु माताजींनी नवदांपत्यांना त्यांचे वैवाहिक जीवन सुखसमृद्धीचे व्हावे, अशा शुभेच्छा देतानाच सत्संग, स्मरण आणि निष्काम सेवा करण्याची प्रेरणा प्रदान केली.