‘एमपीएससी’ मागे धावताना ९९ टक्के होतात अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:11 AM2021-03-14T04:11:30+5:302021-03-14T04:11:30+5:30

अमोल अवचिते लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) या परीक्षा देऊन ...

99% fail when running behind MPSC | ‘एमपीएससी’ मागे धावताना ९९ टक्के होतात अपयशी

‘एमपीएससी’ मागे धावताना ९९ टक्के होतात अपयशी

Next

अमोल अवचिते

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) या परीक्षा देऊन प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न दरवर्षी लाखो तरुण पाहतात. यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र यात यशस्वी ठरणाऱ्यांचे प्रमाण जेमतेम एक टक्का देखील नसल्याचे गेल्या पाच वर्षांच्या आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे.

अधिकार पदाची जागा पटकावण्यासाठी लाखो तरुण दरवर्षी स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात येऊन अनेक नशीब आजमावतात. मात्र योग्यवेळी स्वत:च्या क्षमतांचा योग्य अंदाज न घेता या मृगजळामागे धावत राहतात आणि आयुष्यातला महत्त्वाचा कालखंड वाया घालवतात, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी ‘लोकमत’कडे मांडले.

एमपीएससीची राज्य सेवा पूर्व परीक्षा १४ मार्चला होणार नसल्याचे समजताच राज्यात झालेला विद्यार्थ्यांचा उद्रेक नुकताच सर्वांनी पाहिला. यानिमित्ताने विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न समोर आले आहेत. एमपीएससीचे अनियमित वेळापत्रक, न्यायालयीन लढाई, आरक्षण, निवडणूका आदी कारणांमुळे परीक्षा प्रक्रियेला लागणारा वेळ यात विद्यार्थ्यांची मोलाची वर्षे वाया जात आहेत. दुसरीकडे नैराश्यात भर पडत आहे. जेवढ्या प्रमाणात परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या आहे. तेवढ्या प्रमाणात जागा निघतात का? हा मोठा प्रश्न आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण किती याची सत्यता पडताळण्याची गरज आहे. सातत्याने ज्यांना परीक्षेत अपयश येते त्या विद्यार्थ्याकडे अन्य पर्याय (बी प्लॅन) आहे का? याचा विचार करण्याची गरज आहे. त्याच बरोबर सोबत दिलेल्या गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे. असे जाणकारांचे म्हणणे आहे.

चौकट

बोलके आकडे

वर्ष भरलेली पदे परीक्षेसाठी आलेलले अर्ज यशस्वी विद्यार्थ्यांची टक्केवारी

२०१९-२० ४८६७ १५, ३४, ३३७ ०. ३२

२०१८-१९ ५३६७ २६, ६४, ०४१ ०. २०

२०१७-१८ ८६८८ १७, ४१, ०६९ ० . ५०

२०१७-१६ ३२५४ ११, ३४, २०० ०. २९

२०१६-१५ ५४९२ ५, २९, ६९५ १. ०४

एकूण २७,६६४ ७६,०३, ३४२

चौकट

‘प्लान बी’ हवाच

* स्वत:ची आवड, क्षमता ओळखा

* स्पर्धा परीक्षेची तयारी पदवीला असतानाच सुरु करा.

* पदवीनंतर स्पर्धा परीक्षेसाठी किमान ३ ते ५ वर्षाचा कालावधी द्यावा यश आले तर उत्तम. अन्यथा ‘बी प्लॅन’ हवाच.

* अन्य क्षेत्रातही अनेक संधी आहेत, त्याची माहिती ठेवावी.

* चुकीचे मार्गदर्शन, बड्या जाहिराती यांना भुलू नये.

चौकट

लक्षात घ्यावे असे

* पहिल्या दोन ते तीन वर्षात चांगला अभ्यास करता येऊन यश मिळवता येते, याचा आत्मविश्वास ठेवावा.

* सगळीच स्वप्ने पूर्ण होत नसतात.

* स्पर्धा परीक्षा म्हणजेच आयुष्य नाही हे भान हवे.

* आई-वडील, कुटुंब हे देखील परीक्षेइतकेच महत्वाचे असल्यचे विसरु नका.

* अपयश स्वीकारण्याची मानसिकता ठेवा.

चौकट

सरकारची जबाबदारी

* रिक्त जागांचे मागणीपत्र एमपीएससीला वेळेवर पाठवावे.

* नियुक्त्या, प्रशिक्षण प्रलंबित ठेऊ नका

* एमपीएससी स्वायत्त संस्था असल्याचे भान ठेवा.

चौकट

‘एमपीएससी’कडून अपेक्षा

* दरवर्षी वेळापत्रक जाहीर करा.

* ठरलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा घ्या.

* परीक्षा यादी जाहीर करा

* एकदा वर्ग एक पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला पुन्हा वर्ग दोनच्या पदासाठी मनाई करा.

* सरकारच्या दबावाला बळी पडू नका.

चौकट

“शासनाच्या बदलत्या धोरणाचा फटका अनेक विद्यार्थाना बसला आहे. नोकर भारती बंद करणे योग्य नाही. मुलांनी स्पर्धा परीक्षेच्या मृगजळाला न भुलता इतर पर्यायांचा विचार करावा. पालकांनी मुलांच्या करियर बाबतीत दृष्टिकोन ठेवला पाहिजे. या परीक्षांमध्ये वर्षे वाया जाणार नाहीत याची घ्यावी. या क्षेत्रात खूप मोठी तरुण शक्ती वाया जात असल्याची खंत वाटते.”

-राजेंद्र कोंढरे, अध्यक्ष, शिवसह्याद्री चॅरिटेबल फाउंडेशन.

चौकट

आर्थिक स्थितीचा दबाव

“कोणत्याही पालकाला पाल्याचे अपयश बघण्याची इच्छा नसते. पाठिंबा देऊन त्याला अभ्यास करायला सांगतो. कर्ज काढून, जमीन विकून, सोने गहाण ठेवून पैसे दिले जातात. याचा देखील दबाब विद्यार्थ्यांवर असतो. वेळीच पाल्याला ओळखता आले तर अनेक गोष्टी सोप्या होतील.”

-राजेश शिंदे, पालक.

Web Title: 99% fail when running behind MPSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.