चांदणी चौक उड्डाणपूल प्रकल्पासाठी ९९ टक्के भूसंपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:13 AM2021-02-13T04:13:21+5:302021-02-13T04:13:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : चांदणी चौकामध्ये उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या जागांपैकी ९९.५ टक्के भूसंपादन करण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : चांदणी चौकामध्ये उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या जागांपैकी ९९.५ टक्के भूसंपादन करण्यात आले आहे. या जमिनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे जानेवारी २०२१ मध्ये बांधकामासाठी हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
या कामाचा आढावा केंद्रीय रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी शनिवारी घेणार आहेत. पुणे दौऱ्यावर असलेले गडकरी यांनी या उड्डाणपुलाची पाहणी करावी, अशी विनंती महापौर मोहोळ यांनी केली होती. तब्बल ९०० कोटींच्या प्रकल्पासाठी पालिका ४६५ कोटी २२ कोटी रुपये खर्च करीत आहे. पालिकेच्या हिश्श्यातील रकमेमध्ये १८५ कोटी ४३ लाख रुपये राज्य सरकारकडून प्राप्त झाले असल्याचे महापौरांनी सांगितले. या रस्त्याच्या एकात्मिक विकसित करण्यासाठी एनसीसी या एजन्सीची नियुक्ती २८ फेब्रुवारी २०१९ रोजी करण्यात आली होती.
प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या १८.९७३ हेक्टर जागेसाठी १३८ मिळकतीपैंकी सद्यस्थितीत १३१ जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. त्यासाठी १८५ कोटी ४३ लाखांचा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता, असे मोहोळ यांनी सांगितले.