नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ९९ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2023 04:59 PM2023-04-28T16:59:06+5:302023-04-28T16:59:17+5:30
दोन जागा बिनविरोध झाल्यानंतर आता १६ जागांसठी ३३ उमेदवार आपले नशीब आजमावत
नीरा : पुरंदर व बारामती तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीची आज शुक्रवारी (दि.२८) निवडणूकीचे मतदान झाले. दोन जागा बिनविरोध झाल्यानंतर आता १६ जागांसठी ३३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. पुरंदरच्या ५ तर बारामतीच्या ४ मतदान केंद्रावर सकाळी आठ ते चार यावेळेत विक्रमी ९९ टक्के मतदान झाले आहे.
नीरा बाजार समितीची बिनविरोधची परंपरा मोडत यावर्षी चुरशीची निवडणूक होत आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी व भाजप, शिवसेना, आरपीया आठवले गट महायुती यांच्यात दावे प्रतिदावे करत अटितटीची निवडणूक पारपडली. सासवड परिसरात सकाळी पाऊस झाल्याने मतदान संथगतीने होते. मात्र दहानंतर मतदानाचा वेग वाढला होता. दुपारी दोन पर्यंत ८५ टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर चार वाजेपर्यंत ९८.७३ टक्के मतदान झाले आहे. मताचा टक्का विक्रमी असल्याने मतदारांनी कोणाच्या बाजूने मतदान केले आहे याबाबत कमालची उत्सुक्ता आहे.
सोसायटी मतदार संघातील १ हजार ९१७ पैकी १ हजार ८१६ (९४.७३ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, ग्रामपंचायत मतदार संघातील १ हजार ९८ पैकी १ हजार ३५ ( ९४.५२ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, हमाल तोलारी मतदार संघातील १२९ पैकी १२० (९३ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
नीरा येथील मतदान केंद्रावर बारामती तालुक्यातील तीन तर पुरंदर तालुक्यातील अकरा गावांच्या सोसायटीचे सदस्य व ग्रामपंचायतीचे सदस्य मतदान करण्यासाठी येत होते. हमाल तोलारी या मतदार संघातील बहुतांश मतदार नीरा परिसरातील असल्याने या मतदारसंघातील मतदान केंद्रावर सकाळी रांग दिसून आली. दोन्ही उमेदवार नीरेतीलच असल्याने खेळीमेळीच्या वातावरणात येथे मतदान होत असल्याचे दिसून आले. सकाळी दहानंतर सोसायटी व ग्रामपंचायत मतदार संघातील मतदारांनी एकत्रीत एकाच वाहनात येऊन मतदान केले.
नीरा येथील मतदान केंद्राबाहेर बारामती व पुरंदर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना, भाजप, आरपीआयचे नेते ठाणमांडून होते. आमदार संजय जगताप, माजी आमदार विजय शिवतारे, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष जालिंदर कामठे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे, माजी बांधकाम सभापती प्रमोद काकडे, विराज काकडे, प्रदिप पोमण, नंदुकाका जगताप, माणिकराव चोरमले, गंगाराम जगदाळे, सचिन लंबाते, अतुल म्हस्के, भुषण ताकवले, सोमेश्वरच संचालक लक्ष्मण गोफण, जितेंद्र निगडे यांसह परिसरातील नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.