नांदेड गावातील १०२ वर्षांच्या आजोबांची मतदानाची अविरत परंपरा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 09:03 AM2024-11-20T09:03:43+5:302024-11-20T09:04:12+5:30
आजपर्यंत झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करून आपला हक्क बजावला
पुणे : स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुकीपासून आज म्हणजेच २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावणारे १०२ वर्षांचे आजोबा म्हणजेच नांदेड गावचे ग्रामस्थ निवृत्ती दारवटकर.
१९ मे १९२३ रोजी सिंहगड रस्त्यावरील नांदेड गावात जन्मलेल्या निवृत्ती दारवटकर यांनी नुकतेच वयाच्या १०२ वर्षात पदार्पण केले आहे. या वयातही त्यांची अपार इच्छाशक्ती तरुणाईला लाजवेल अशीच आहे. ते सर्वप्रथम १९५२ साली झालेल्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीमध्ये सहभागी झाले होते. महाराष्ट्राच्या १९६२ पासून होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये सहभागी होण्याचे भाग्यदेखील लाभल्याचे ते अभिमानाने सांगतात. आजपर्यंत झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करून आपला हक्क बजावला आहे.
निवृत्ती दारवटकर यांचे शिक्षण इयत्ता तिसरीपर्यंत झालेले असून त्यांना मोडी लिपी अवगत आहे. ते आजही मोडी लिपी वाचू शकतात, तसेच लिहूदेखील शकतात. कुस्ती क्षेत्रात त्यांना लहानपणापासूनच रुची असल्याने त्यांनी त्यामध्येदेखील नावलौकिक मिळविला आहे. निवडणुकीमध्ये मतदानासाठी वयाचे कोणतेही कारण न सांगता ते आपल्या नातवंडांना बरोबर घेऊन मतदान केंद्रावर जाऊनच मतदान करत असल्याचे त्यांचे नातू अजय दारवटकर यांनी सांगितले.