उच्च दाब वीज वाहिनीने घेतला १४ वर्षीय मुलाचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 03:17 PM2022-10-31T15:17:24+5:302022-10-31T15:34:59+5:30
घटनेला जबाबदार असलेले कोणीही इकडे फिरकले नाही - वडिलांचा आरोप
धनकवडी : कात्रज कोंढवा बाह्य वळण रस्त्यावरील ओमकार सोसायटीत खेळताना गार्डनमध्ये गेला असता तेथे लोंबकाळणाऱ्या उच्च दाब वीज वाहिनीचा धक्का लागून गंभीर जखमी झालेल्या १४ वर्षांच्या मुलाचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. ऋषिकेश पुजारी (१४, रा. कर्वेनगर) असे या मुलाचे नाव आहे. राजीव गांधी पंपिंग स्टेशन ते गोकुळनगरकडे जाणारी २२ केव्ही उच्च दाब वाहिनी ओमकार सोसायटीच्या सीमा भिंतीनंतर गार्डनमध्ये अनेक दिवसांपासून लोंबकळत आहे. त्याकडे महावितरणचे दुर्लक्ष झाल्याने २३ ऑक्टोबरला ही दुर्घटना घडली.
ही दुर्घटना घडून आठवडा उलटून गेला तरीही याकडे कोणीही ढुंकून पाहिलेले नाही. जखमी अवस्थेत असताना ऋषिकेशची साधी चौकशीही कोणी केली नाही. मात्र ऋषिकेशच्या मृत्यूमुळे धोकादायक, असुरक्षित उच्चदाब वीजवाहिन्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
याबाबतची माहिती अशी, कर्वेनगरला राहणारे मंजुनाथ पुजारी हे सिंहगड रोड परिसरातील एका दुकानात फर्निचरचे काम करतात. कामानिमित्त ते कात्रजला आले होते. शाळेला सुट्टी असल्याने त्यांचा इयत्ता नववीमध्ये शिकणारा मुलगा ऋषिकेश त्यांच्याबरोबर आला होता. पुजारी काम करीत असताना तो बाहेर खेळत होता. खेळताना त्याचा चेंडू ओमकार सोसायटीमधील गार्डन भागात गेला. तेथे लोंबकळणाऱ्या उच्च वीज वाहिनीच्या संपर्कात ऋषिकेश आला आणि गंभीर जखमी झाला होता. परिसरातील नागरिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
उपनगरातील महावितरण आणि महापारेषणच्या उच्चदाब वीज वाहिन्यांचे जाळे दाट लोकवस्तीसाठी धोकादायक ठरत आहे. धनकवडीसह परिसरात गेल्या दहा वर्षात टॉवर लाइनच्या उच्चदाब वीज वाहिन्यांच्या धक्क्याने चार ते पाच जणांचा मृत्यू झाले आहेत. दोन महिन्यांपूर्वी सिंहगड रोडवर फुटपाथवर पडलेल्या उच्च दाब वाहिनीचा धक्का लागल्याने एका २० वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला.
''घटना कळल्यावर मी लगेच रुग्णालयात गेलो. मुलगा अतिदक्षता विभागात होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. या काळात याला जबाबदार असलेले कोणीही इकडे फिरकले नाही. - मंजूनाथ पुजारी, मुलाचे वडील''