व्यापारी जहाजावर डेक कॅडेट म्हणून काम करणारा पुण्यातील २२ वर्षीय तरुण बेपत्ता
By नितीश गोवंडे | Published: April 7, 2024 06:23 PM2024-04-07T18:23:04+5:302024-04-07T18:23:21+5:30
विल्हेल्मसेन शिप मॅनेजमेंट कंपनीकडून तरुणाचे सहकारी आणि मित्रांचे मोबाईल क्रमांक देण्यास नकार, कुटुंबीयांचा आरोप
पुणे: मुंबईतील एका व्यापारी शिपिंग कंपनीत डेक कॅडेट म्हणून काम करणारा पुण्यातील २२ वर्षीय तरुण शुक्रवारी (दि. ५) रात्रीपासून बेपत्ता असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली आहे. जेव्हा तो बेपत्ता झाला तेव्हा तो सिंगापूर आणि इंडोनेशिया दरम्यान प्रवास करणाऱ्या टँकरवर तैनात होता. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या कुटुंबाला या घटनेची माहिती दिली. तरुणाचे कुटुंबीय त्याला शोधण्यासाठी भारतातील विविध सरकारी अधिकाऱ्यांची मदत घेत आहेत. तसेच मुलाच्या शोध घेण्यासाठी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे.
पुण्यातील वारजे परिसरात राहणारा प्रणव गोपाळ कराड हा गेल्या सहा महिन्यांपासून मुंबईतील विल्हेल्मसेन शिप मॅनेजमेंट इंडिया या कंपनीत नोकरीला आहे, असे त्याचे वडील गोपाळ कराड यांनी सांगितले. गोपाळ कराड हे पुण्यात चालक म्हणून काम करतात.
प्रणवने एमआयटी, पुणे येथून नॉटीकल सायन्सचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता आणि तो अमेरिकेतील कंपनी विल्हेल्मसेन शिप मॅनेजमेंटमध्ये काम करत होता. तो रिझोल्व्ह II जहाजावर डेक कॅडेट म्हणून तैनात होता. शुक्रवारी (ता. ५) प्रणवच्या वडिलांना कंपनीकडून तो हरवला असल्याचा फोन आला. त्यानंतर या संदर्भात शनिवारी (ता. ६) मेल आला की सिंगापूर आणि इंडोनेशिया दरम्यान प्रणव जहाजातून बेपत्ता झाला. परंतु त्यानंतर कंपनीकडून काहीच माहिती दिली जात नसल्याचे गोपाळ कराड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
गोपाळ पुढे म्हणाले, कंपनी आम्हाला सांगत आहे की शोध सुरू आहे. परंतु तो कसा बेपत्ता झाला याबद्दल काहीच माहिती दिली जात नाही. गुरुवारी (ता. ४) आम्ही त्याच्याशी सोशल मीडियाद्वारे कॉलवर बोललो. विल्हेल्मसेन शिप मॅनेजमेंट कंपनीकडून प्रणव याच्या सहकारी आणि मित्रांचे मोबाईल क्रमांक देण्यास नकार दिला आहे, असा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात परराष्ट्र मंत्रालय, जहाज बांधणी मंत्रालयाशी संपर्क करुन मुलाचा शोध घ्यावा, अशी मागणी गोपाळ कराड यांनी केली आहे. तसेच संबंधितांपर्यंत पोहोचण्यासाठी पुणे आणि मुंबईतील पोलिस आणि अन्य प्राधिकरणांशी संपर्क साधत असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे पोलिसांनी दिला मुंबईला जाण्याचा सल्ला..
प्रणवचे वडील गोपाळ कराड यांनी वारजे पोलिस ठाण्यात याप्रकरणी अर्ज दिला असून, रविवारी (ता. ७) ते पोलिस आयुक्तालयात देखील यासंदर्भात गेले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना मुंबईतील अंधेरी पोलिसांशी संपर्क साधण्याचा सल्ला दिल्याचे त्यांनी सांगितले.