Pune Crime: रोज ३ हजार रुपये कमावण्याच्या नादात २७ वर्षीय तरुणीने गमावले १६ लाख
By भाग्यश्री गिलडा | Updated: April 29, 2024 17:06 IST2024-04-29T17:05:50+5:302024-04-29T17:06:13+5:30
याप्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात रविवारी (दि. २८) गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

Pune Crime: रोज ३ हजार रुपये कमावण्याच्या नादात २७ वर्षीय तरुणीने गमावले १६ लाख
पुणे : टेलिग्रामवर ओळख करून पार्टटाइम नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात रविवारी (दि. २८) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगणे परिसरात राहणाऱ्या एका २७ वर्षीय तरुणीने पोलिसांत फिर्याद दिली आहे. तरुणीला अनोळखी मोबाइल क्रमांकावरून एक मेसेज आला. ऑनलाइन पार्टटाइम जॉब ‘वर्क फ्रॉम होम’द्वारे चांगले पैसे कमावता येतील. दरदिवशी ३ हजार २०० रुपये कमावण्याची संधी आहे, असे त्यात म्हटले हाेते.
काम करण्यास होकार दिल्यावर तरुणीला कंपनीचे बनावट ऑफर लेटर दिले. त्यानंतर गुगलवर रिव्ह्यू - रेटिंग देण्याचे काम करण्यास सांगितले. एक टास्क पूर्ण केल्यास २१० रुपये मिळतील, असेही सांगितले. सुरुवातीला मोबदला देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर गुंतवणुकीचे आमिष दाखवून प्रीपेड टास्कच्या नावाखाली एकूण १६ लाख ८१ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. पैसे भरूनही परतावा न मिळाल्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक क्षीरसागर पुढील तपास करीत आहेत.