जीवनसाथी निवडणाऱ्या साईटवरुन २९ वर्षीय तरुणीला २३ लाखांना गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 11:43 AM2023-06-09T11:43:31+5:302023-06-09T11:45:02+5:30
परदेशातून मौल्यवान वस्तू गिफ्ट म्हणून पाठवत असल्याचे भासवून दोन तरुणींना २२ लाख ८३ हजार ९६९ रुपयांना गंडा घातला...
पुणे : जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाईटवर ओळख झालेल्या तरुणाने परदेशातून मौल्यवान वस्तू गिफ्ट म्हणून पाठवत असल्याचे भासवून दोन तरुणींना २२ लाख ८३ हजार ९६९ रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी एका २९ वर्षाच्या तरुणीने चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी आयटी ॲक्टखाली गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी यांची जीवनसाथी डॉट कॉम वर विराट पटेल याची ओळख झाली होती. पटेल याने त्यांना लग्नाचे आमिष दाखविले. आपण परदेशात काम करीत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने मौल्यवान वस्तू गिफ्ट पाठवत असल्याचे सांगितले. त्यानंतर या तरुणीला दिल्ली एअरपोर्टवर हे गिफ्ट कस्टमने अडविल्याचे सांगण्यात आले.
इम्पोर्ट चार्जेस म्हणून त्यांच्याकडे सुरुवातीला ३२ हजार ९०० रुपये मागितले. त्यानंतर इन्कम टॅक्स, डिलिव्हरी टॅक्स चार्ज अशी वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून पैसे उकळण्यात आले. तसेच विराट पटेल याने आपल्याला चेक इंडियन रुपीमध्ये कन्व्हर्ट करुन घेण्यासाठी पैसे हवे असल्याचे सांगून तिच्याकडून आणखी पैसे मागितले. अशा प्रकारे तिने १३ लाख ५३ हजार ९६९ रुपये भरल्यानंतर एअरपोर्टवरील व्यक्ती तिला आणखी पैसे भरावे लागतील, असे सांगत राहिली. तेव्हा तिने हा प्रकार आपल्या नातेवाईक तसेच वकिलाला सांगितला. त्यांच्याकडून असे प्रकार एअरपोर्टवर घडत नाही, असे सांगितल्यावर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
अशाच प्रकारे खराडी येथे राहणाऱ्या आणखी एका तरुणीला ९ लाख ३० हजार रुपयांना फसविण्यात आल्याचे समोर आले आहे. चंदननगर पोलिस तपास करीत आहेत.
सायबर चोरट्यांचा नवा फंडा :
आपल्या जाळ्यात सापडलेल्या तरुणीला हे चोरटे पार्सल नंबर देतात. तिला पार्सलला ट्रॅकवर ठेव म्हणून सांगतात. तिने पार्सलचा ट्रॅक नंबर मोबाईलवर पाहिल्यावर तिला तो युकेहून दिल्ली आल्याचे दिसते. त्यामुळे खरंच पार्सल आल्याचा विश्वास बसतो.