झोपमोड केल्याचा राग; पुण्यात भाडेकरूने घरमालकाला पाण्याच्या टाकीत बुडवून संपवले!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 10:50 AM2023-11-23T10:50:02+5:302023-11-23T10:52:06+5:30
क्षुल्लक कारणातून झालेल्या वादानंतर भाडेकरूने घरमालकाला मारहाण करुन पाण्याच्या टाकीत बुडवून जीवे मारले.
पुणे :पुणे शहर आणि परिसरात मागील काही काळापासून गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. खून, जीवघेणे हल्ले, दुकानांची तोडफोड असे प्रकार सातत्याने घडत आहेत. अशातच शहरापासून जवळच असलेल्या लोणी काळभोर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. दुपारी झोपमोड केली, या क्षुल्लक कारणातून भाडेकरूने घरमालकाचा जीव घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. संतोष राजेंद्र धोत्रे (वय ३७, रा. खंडोबा माळ, ता. हवेली) असं आरोपीचं नाव असून दादा ज्ञानदेव घुले (वय ५०, रा. खंडोबा माळ, उरुळी देवाची, ता. हवेली) असं खून झालेल्या घरमालकाचं नाव आहे.
याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष धोत्रे हा दादा घुले यांचा भाडेकरू आहे. दोघेही बांधकामावर मिस्त्री म्हणून काम करतात. सोमवारी दुपारी ते दोघे दारु प्यायले होते. त्यानंतर संतोष धोत्रे हा झोपायला गेला. दादा घुले यांनी मोटारसायकल सुरू करुन तिचा एक्सिलेटर वाढवला. मोटारसायकल रेस करुन ठेवल्यामुळे धोत्रे याची झोपमोड झाल्याने त्यावरुन दोघांमध्ये वाद झाला.
बाचाबाचीचे रुपांतर नंतर हाणामारीत झाले आणि संतोष धोत्रे याने दादा घुले यांना मारहाण करुन पाण्याच्या टाकीत टाकले. त्यात घुले यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
दरम्यान, घुले हे दुपारी दीड वाजल्यापासून घरी आले नव्हते. त्यामुळे मृत दादा घुले यांचा पुतण्या प्रथमेश घुले हा आपल्या एका मित्राला घेऊन खंडोबाचा माळ देवाची उरुळी येथे गेला. घराची पाहणी केली तेव्हा दादा घुले यांची चप्पल आणि मोबाईल घरातील जमिनीखालील टाकीजवळ दिसून आला. टाकीत डोकावून पाहिले तेव्हा दादा घुले यांचा मृतदेह पाण्यावर तंगताना दिसून आला. प्रथमेश घुले यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन संतोष धोत्रे याला अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र खैरनार हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.