बारामतीकर युवकाची कर्तव्यपथावरुन उत्तुंग भरारी; दिल्लीतील परेड दरम्यान केले सुखोईचे सारथ्य
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 03:22 PM2023-01-27T15:22:54+5:302023-01-27T15:42:10+5:30
तरुण वयात लढाऊ विमाने उडविण्याची संधी युवकाने त्याच्या जिद्दीच्या बळावर मिळवली
बारामती : बारामतीच्या युवकाने घेतलेल्या एैतिहासिक गगनभरारीचे सर्वत्र कौतुक होत आहे.दिल्ली येथे गुरुवारी(दि २६) प्रजासत्ताक दिनी झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्यादिल्ली येथील परेडदरम्यान वायुदलाच्या सुखोई एमकेआय ३० या विमानांनी कर्तव्यपथावरुन उत्तुंग भरारी घेतली. या तीन सुखोई विमानांपैकी एका विमानाचे सारथ्य करण्याचा बहुमान एका बारामतीकर युवकाला मिळाला आहे.
स्क्वाड्रन लिडर अक्षय प्रमोद काकडे (वय २७) असे या युवकाचे नाव आहे. अक्षय यांनी ग्रुप कँप्टन ए. धनकर व विंग कमांडर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सलामी दिली. दरवर्षी प्रजासत्ताक दिनी भारतीय वायुदलाच्या सामथ्यार्चे प्रदर्शन देशवासियांना घडविले जाते. यंदा वायुदलाच्या तीन सुखोई विमानांनी हवेत झेप घेत त्रिशूल फॉर्मेशन घडविले. यासाठी धाडस आणि अत्यंत मेहनत व खडतर सराव आवश्यक असतो. अक्षय यांनी हे आव्हान स्वीकारत एका सुखोईचे सारथ्य केले.
तरुण वयात लढाऊ विमाने उडविण्याची संधी अक्षय यांनी त्यांच्या जिद्दीच्या बळावर मिळवली. वडील उद्योजक प्रमोद काकडे व आई संगीता काकडे यांचे प्रोत्साहन त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी महत्वाचे ठरले. अक्षय यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान विनोदकुमार गुजर बालविकास मंदिरमध्ये झाले. एक दिवस शाळेची सहल खडकवासल्याच्या एन.डी.ए. (राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी) मध्ये गेली होती. त्यानंतर तेथील जीवन पाहून प्रभावित झालेल्या अक्षय यांनी येथेच दाखल होण्याचे स्वप्न पाहिले, तसेच परीक्षा दिली. अत्यंत खडतर प्रशिक्षण पुर्ण करीत पदवी प्राप्त केली. एनडीए मधील प्रशिक्षणानंतर हैदराबाद्च्या एअरफोर्स अँकेडमीमध्ये दाखल होत वर्षभराचे प्रशिक्षण प्राप्त केल्यानंतर वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी भारतीय वायुदलातील लढाऊ विमाने चालविणारा फ्लाईंग आॅफिसर म्हणून त्याची नियुक्ती झाली होती. लहानपणापासूनच देशासाठी काहीतरी करण्याची खुणगाठ त्यांनी मनाशी बाळगली होती. वायुदलात प्रवेश केल्यानंतर फ्लार्इंग आॅफीसर ते स्क्वाड्रन लिडरपर्यंतचा अभिमानास्पद असा यशस्वी प्रवास त्यांनी काही वर्षात पुर्ण केला आहे. त्यांना नुकतेच वायुसेना अध्यक्ष प्रशंसा पदक प्राप्त झाले आहे.