व्यक्तीचे आई-वडिल, मित्र, नातेवाईक अशा सर्वांचे नातेसंबंध असणारी बायोग्राफी उत्तम ठरते - डॉ. रामचंद्र गुहा
By श्रीकिशन काळे | Published: May 26, 2023 04:16 PM2023-05-26T16:16:02+5:302023-05-26T16:21:31+5:30
'लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर यांना ‘मसाप’चा ग्रंथकार पुरस्कार
पुणे : बायोग्राफी चांगली तयार करायची असेल, तर त्यासाठी काही गोष्टी आवश्यक असतात. केवळ एका व्यक्तीमुळे चांगली बायोग्राफी तयार करता येत नाही, तर त्याच्या आयुष्यातील आजुबाजूच्या व्यक्तीरेखांमुळे ती माहितीपूर्ण बनते. त्यासाठी बायोग्राफीत त्या व्यक्तीचे आई-वडिल, मित्र, नातेवाईक अशा सर्वांचे नातेसंबंध यायला हवेत. तरच बायोग्राफी चांगली कलाकृती ठरते, असा मोलाचा सल्ला ज्येष्ठ इतिहासकार, विचारवंत डॉ. रामचंद्र गुहा यांनी दिला.
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे च्या ११८ व्या वर्धापनदिनानिमित्त वार्षिक ग्रंथ व ग्रंथकार पारितोषिक प्रदान सोहळा शुक्रवारी एस. एम. जोशी सभागृहात झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंच डॉ.रावसाहबे कसबे, ‘मसाप’चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, मसापच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, कार्यकारी विश्वस्त डॉ. डी. पी. पाटील, कार्यवाह उध्दव कानडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे भोसले व्यासपीठावर उपस्थित होते. सभागृहात ज्येष्ठ लेखक डॉ. राजा दीक्षित, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ, खासदार श्रीनिवास पाटील, ‘रंगतसंगत’चे संस्थापक प्रमोद आडकर, दीपक करंदीकर आदी उपस्थित होते.
विशेष ग्रंथकार पुरस्कारांमध्ये ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे, एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके, ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर, ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक मुकुंद संगोराम, ‘पुढारी’चे निवासी संपादक सुनील माळी, ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस, पत्रकार श्रीकांत बोजेवार, लेखिका-पत्रकार स्वाती राजे, सूत्रसंचालक अरूण नूलकर, लेखक-वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. शिरीष भावे, चित्रकार राजू बाविस्कर, संगीतकार प्रा. चैतन्य कुंटे, माजी आमदार ॲड. जयदेव गायकवाड, डॉ. एस. एन. पठाण, डॉ. मंदा खांडगे, डॉ. वर्षा तोडमल आदींचा समावेश आहे.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले,‘‘मसापतर्फे विविध उपक्रम घेतले जातात. त्यामध्ये मराठीला अभिजात दर्जा मिळावा म्हणून आम्ही १ लाख पत्रे सरकारला पाठविली. संमेलनाध्यक्ष पदासाठी निवडणूकीत वाद होतात म्हणून आम्ही घटनेत बदल करून अध्यक्षपद सन्मानाने देण्याची परंपरा सुरू केली. मराठी भाषा सक्तीची व्हावी म्हणून पाठपुरावा केला.’’
''दक्षिणेतील काही व्यक्तींनी महात्मा गांधीविषयीचे चरित्रलेखन केले आहे. त्याचे शंभर खंड तयार झाले. गांधींनी केलेले पत्रव्यवहार, त्यांच्याविषयी वृत्तपत्रात आलेले लेखन व इतर सर्व साहित्य एकत्र करून हे शंभर खंड बनले. याचाच अर्थ तुमच्या आजुबाजूच्या लोकांमुळे तुमचे चरित्र चांगल्याप्रकारे लिहिता येते. - डॉ. रामचंद्र गुहा, ज्येष्ठ इतिहासकार-विचारवंत''