रमजान ईदच्या दिवशी रेल्वे स्थानकात बॉम्ब; दारुच्या नशेत 'त्यांनी' केला होता फोन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 12:07 PM2022-05-05T12:07:01+5:302022-05-05T12:07:13+5:30
पुणे : रमजान ईदच्या दिवशी रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवला असून, त्याचे लोकेशन हवे असेल तर ७ कोटी रुपये द्यावे ...
पुणे : रमजान ईदच्या दिवशी रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवला असून, त्याचे लोकेशन हवे असेल तर ७ कोटी रुपये द्यावे लागतील, असा दहशत पसरविणारा कॉल करून पोलिसांनाच खंडणी मागून संपूर्ण राज्यात खळबळ उडवली होती. हा कॉल करणाऱ्याने तो कॉल दारुच्या नशेत केल्याचे निष्पन्न झाले आहे. मजुरांच्या या कॉलमुळे संपूर्ण राज्यातील रेल्वे पोलीस व पोलीस दल कामाला लागले होते.
रेल्वे पोलिसांनी करण भिमाजी काळे (वय ३३, रा. नाव्हरे,ता. शिरुर) आणि सूरज मंगतराम ठाकूर (वय ३०, रा. नशेली, ता. मुखेरिया, जि. होशियारपूर, पंजाब, सध्या रांजणगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
नवी मुंबईतील नियंत्रण कक्षाला मंगळवारी दुपारी चार वाजता एक कॉल आला होता. त्यात त्याने रेल्वे परिसरात बॉम्ब ठेवला आहे. बॉम्बबाबत अधिक माहिती हवी असल्यास मला ७ कोटी रुपये द्यावेत, असे त्यावर सांगण्यात आले. या कॉलरचे ठिकाण वाघोली असल्याने नियंत्रण कक्षाकडून सर्व रेल्वे पोलीस व पुणे शहर पोलीस दलाला तातडीने कळविण्यात आले. रेल्वे पोलिसांनी त्यातील गांभीर्य लक्षात घेऊन १७ रेल्वेगाड्या तपासल्या. परिसरातील कानाकोपरा पिंजून काढला. त्याचवेळी शहर पोलीस दलाने मोबाइल नंबरवरून संशयिताचा शोध सुरू केला होता. लोहमार्ग पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांच्या सूचनेनुसार उपविभागीय अधिकारी श्रीकांत क्षीरसागर, पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर, सहायक निरीक्षक बाळासाहेब अंतरकर व त्यांच्या सहकार्यांची ४ पथके तयार करून संशयितांचा शोध सुरू केला. वाघोली परिसरातून करण काळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे २ मोबाइल मिळाले. त्याच्याकडील मोबाइलवरून हा कॉल केल्याचे निष्पन्न झाले. त्यातील सीम कार्ड हे सुरज ठाकूर याने दिल्याचे सांगितल्यावर त्याला रांजणगाव एमआयडीसीमधून पकडण्यात आले.
करण काळे व सूरज ठाकूर हे दोघेही मजुरी काम करतात. काळे हा वाघोली परिसरातील कंपन्यांमध्ये मिळेल ते काम करतो. दारुच्या नशेत त्याने हा फोन केल्याचे तो सांगतो; मात्र असा फोन करण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यांचा कोणाशी संबंध आहे का, दहशत पसरविण्यासाठी त्यांना कोणी असा कॉल करायला सांगितला, याचा पोलीस तपास करीत आहेत.