पावसाची विश्रांती! उकाडा चांगलाच वाढला; पुणेकरांना सप्टेंबरमध्ये ‘ऑक्टोबर हिट’ चा चटका
By श्रीकिशन काळे | Published: September 1, 2023 04:43 PM2023-09-01T16:43:15+5:302023-09-01T16:43:48+5:30
सद्यस्थितीत अतिहलक्या स्वरूपाच्या सरी कोसळतील, असा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
पुणे : सध्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे किमान तापमानाचा पारा चांगलाच चढत आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजता किमान तापमान हे २५.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे. सकाळी पुणेकरांना घाम फुटत आहे. यावरून उन्हाचा चटका किती वाढला आहे, त्याची प्रचिती पुणेकरांना येत आहे.
कधीकाळी पुणे हे थंड हवेचे शहर म्हणून गणले जात होते. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये आता ही ओळख पुसली जात आहे. आता उकाडा चांगलाच वाढला आहे. कारण एक तर शहरातील वाहनांची संख्या प्रचंड वाढली असून, बांधकामे मोठ्या प्रमाणावर झाली. पूर्वीची जी हिरवाई होती, ती कमी झाली. परिणामी शहरातील तापमानात वाढ होत आहे. सप्टेंबर महिन्यात दरवर्षी थंड हवा असते. पण आता किमान तापमान २५ अंश सेल्सिअसच्या जवळपास नोंदविले जात आहे. यावरून पुण्याचे तापमानही आता बिघडल्याचे दिसून येत आहे. खरंतर ऑक्टोबर हिटमुळे पुणेकरांना घाम फुटत नसे. कारण ती हिट देखील खूप कमी असायची. पण आता तर सप्टेंबर महिन्यातच उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. पुढच्या महिन्यातील हिट या महिन्यात सहन करावी लागत आहे.
शहरातील किमान तापमान
वडगावशेरी २५.२
मगरपट्टा २४.९
कोरेगाव पार्क : २४.८
शिवाजीनगर २२.८
एनडीए २१.९
हवेली २१.९
पाषाण २१.२
पुण्यात आकाश अंशत: ढगाळ
आकाश अंशत: ढगाळ राहील. मेघगर्जनेसह अतिहलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. ३ ते ७ सप्टेंबरपर्यंत आकाश ढगाळ राहील. अतिहलक्या स्वरूपाच्या सरी कोसळतील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.