अपघातातील गाडी परत करण्यासाठी दीड लाखांची लाच; पहाटे २ वाजता पकडले
By विवेक भुसे | Published: December 17, 2023 01:29 PM2023-12-17T13:29:21+5:302023-12-17T13:30:16+5:30
पहाटे २ वाजता केली कारवाई, सहायक पोलीस उपनिरीक्षकाला अटक
पुणे : अपघातातील जप्त केलेली गाडी परत करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच मागून त्यापैकी ७० हजार रुपये घेतले. तरीही उरलेले पैसे मागणाºया सहायक पोलीस उपनिरीक्षकाला २० हजार रुपयांची लाच घेताना सापळा रचून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडण्यात आले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने चिखली पोलीस ठाण्यात सापळा लावून पहाटे २ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली आहे.नरेंद्र लक्ष्मण राजे (वय ५४) असे या सहायक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. सध्या तो पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील चिखली पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.
याबाबत एका ३२ वर्षाच्या नागरिकाने तक्रार दिली होती. तक्रारदार यांच्या गाडीचा अपघात झाला होता. या अपघाताबाबत चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या अपघातातील गाडी तक्रारदार यांना परत करण्यासाठी नरेंद्र राजे याने दीड लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती १ लाख रुपये देण्याचे ठरले होते. त्यापैकी १३ डिसेंबर रोजी १५ हजार रुपये आणि १५ डिसेबर रोजी ५५ हजार रुपये राजे याने घेतले होते. उरलेल्या रक्कमेची मागणी तो करत होता. तेव्हा तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्याची शनिवारी पडताळणी करण्यात आली. त्यानंतर चिखली पोलीस ठाण्यात सापळा रचण्यात आला होता. पहाटे २ वाजण्याच्या सुमारास २० हजार रुपयांची लाच घेताना नरेंद्र राजे याला पकडण्यात आले.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलीस शिपाई भूषण ठाकूर, सुराडकर, हवालदार चव्हाण यांनी ही कारवाई केली.