मंचर-भीमाशंकर रस्त्यावर 'बर्निंग बस'चा थरार! दर्शनासाठी चाललेल्या भाविकांच्या बसला आग
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 11:07 AM2022-10-12T11:07:52+5:302022-10-12T11:14:19+5:30
या बसमध्ये २७ प्रवासी होते...
डिंभे (पुणे): घोडेगाव (ता. आंबेगाव) पोलीस स्टेशन हद्दीत शिंदेवाडी येथे आज सकाळी साडे सहाच्या दरम्यान एका बसने पेट घेतला. गाडीतून धूर बाहेर निगताच सर्व प्रवासी खाली उतरले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नाशिक जिल्ह्यातील आगीची घटना ताजी असताना असाच एक अपघात पुणे जिल्ह्यात झाल्याने आता चिंता व्यक्त केली जात आहे.
आज (ता.१२) सकाळी खाजगी बस कंपनीची लक्झरी बस क्रमांक (MH. 05 DK. 9699) घोडेगाववरून भीमाशंकरकडे जात होती. बस मंचर - भीमाशंकर रस्त्यावर शिंदेवाडीजवळ येताच शिंदेवाडी गावच्या हद्दीत येथील वळणावर बसने सकाळी ६.३० च्या दरम्यान अचानक पेट घेतला. बसमध्ये भिवंडी (पाये) या गावातील एकुण २७ प्रवासी होते. यामध्ये २३ महिला प्रवासी, ३ पुरुष यांचा समावेश आहे.
हे सर्व प्रवासी बसने भीमाशंकरकडे देवदर्शनासाठी चालले होते. प्रवास करत असताना बसने अचानक पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने व त्यांच्या टीमने तातडीने घटनास्थळी जाऊन बसमधील प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढले. बसमध्ये एकुण २३ महिला व ३ पुरुष प्रवासी प्रवास करत होते. हे सर्व प्रवासी सुखरूप आहेत.