Pune | घराजवळ नशा करणाऱ्या टोळक्याला हटकल्याने मुंढव्यात व्यावसायिकाचा खून; तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 08:03 PM2023-05-02T20:03:04+5:302023-05-02T20:04:01+5:30

मुंढवा भागातील नागरिकांनी कोयता गँगवर कारवाई करण्यासाठी बंद पाळला...

A businessman was killed in Mundhwa after defeating a drug-dealing gang near his house | Pune | घराजवळ नशा करणाऱ्या टोळक्याला हटकल्याने मुंढव्यात व्यावसायिकाचा खून; तिघांना अटक

Pune | घराजवळ नशा करणाऱ्या टोळक्याला हटकल्याने मुंढव्यात व्यावसायिकाचा खून; तिघांना अटक

googlenewsNext

पुणे : घर आणि गोठ्याजवळ नशा करत बसलेल्या टोळक्याला हटकल्याने टोळक्याने एका व्यावसायिकावर कोयत्याने वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंढवा भागातील केशवनगर येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली. व्यावसायिकाचा खून झाल्याचे उघडकीस आल्यानंतर सोमवारी मुंढवा भागातील नागरिकांनी कोयता गँगवर कारवाई करण्यासाठी बंद पाळला.

रवींद्र दिगंबर गायकवाड (वय ५९, रा. केशवनगर, मुंढवा) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी आकाश अशोक जावळे (वय १९), सागर आकाश जावळे (वय २२, दोघे रा. गजानन मंदिर काॅलनी, मांजरी बुद्रुक), साहिल भीमाशंकर सुतार (वय १९, रा. मांजरी बुद्रुक) यांना अटक करण्यात आली आहे.

सुदेश गायकवाड यांचे केशवनगर येथील श्रीकृपा सोसायटीत घर असून त्यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. तेथेच त्यांचा गाई-म्हशींचा गोठा आहे. गायकवाड यांच्या गोठ्याजवळ काही तरुण अंमली पदार्थांची नशा करत बसले होते. त्यावेळी गायकवाड यांनी त्यांना नशा करता का? अशी विचारणा केली. त्याचा राग आल्याने टोळक्याने त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यानंतर ते निघून गेले. काही वेळाने टोळके कोयते घेऊन आले. त्यांनी गायकवाड यांना पुन्हा शिवीगाळ करून त्यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यानंतर आरोपी दहशत माजवून पसार झाले.

दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या गायकवाड यांना त्यांच्या नातेवाईकांनी तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असतानाच गायकवाड यांचा मृत्यू झाला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पसार झालेल्या तीन आरोपींना अटक करण्यात आली.

मुंढव्यातील केशवनगर भागात कोयता गँगने एकाचा खून केल्याची घटना घडल्यानंतर या भागातील नागरिकांनी बंद पाळला. या भागातील दुकानदारांनी दुकाने बंद ठेवली होती. या भागात दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. मुंढवा भागातील नागरिकांनी बैठक घेऊन पोलिसांना निवेदन दिले. शहरात गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून कोयते उगारून दहशत माजविण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत.

Web Title: A businessman was killed in Mundhwa after defeating a drug-dealing gang near his house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.