मंगळवार पेठेतील २ एकर जागेवर कर्करोग रुग्णालय उभारावे; ‘भाजप’च्या माजी नगरसेवकांची फडणवीसांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 10:13 IST2025-02-20T10:12:30+5:302025-02-20T10:13:17+5:30

२ एकर जागा खासगी विकासकाला पोटभाडेकरारावर देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना झाल्याचा आरोप आहे

A cancer hospital should be built on 2 acres of land in Mangwar Peth; Former BJP corporators demand from Fadnavis | मंगळवार पेठेतील २ एकर जागेवर कर्करोग रुग्णालय उभारावे; ‘भाजप’च्या माजी नगरसेवकांची फडणवीसांकडे मागणी

मंगळवार पेठेतील २ एकर जागेवर कर्करोग रुग्णालय उभारावे; ‘भाजप’च्या माजी नगरसेवकांची फडणवीसांकडे मागणी

पुणे: ससून रुग्णालयाजवळ मंगळवार पेठेतील सुमारे दोन एकर मोक्याची जागा खासगी विकासकाला पोटभाडेकरारावर देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना झाल्याचा आरोप आहे. हा व्यवहार थांबवून तेथे प्रस्तावित कर्करोग रुग्णालय उभारावे, असे पत्र भाजपच्या माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. याच जागेवरून आता भाजप अणि शिंदेसेनेत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मंगळवार पेठेतील भूखंड महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने बांधकाम व्यावसायिकाला साठ वर्षांच्या कराराने दिला आहे. सुमारे ४०० कोटींचा हा भूखंड ७० कोटींना पोटभाडेकरारावर दिल्याचा आरोप आहे. त्यावर भाजपचे महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर आणि माजी नगरसेवक सुहास कुलकर्णी यांनी ही जागा कर्करोग रुग्णालयाला द्यावी, अशी मागणी केली आहे.

‘कर्करोग रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव तयार असून, तो मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी ठेवण्यात येणार असल्याचे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार यांनी जाहीर केले होते. ससून रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय, मध्यवर्ती इमारत, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, फोटो झिंको, पोलिस आयुक्तालय आणि जिल्हा परिषद आदी महत्त्वाची शासकीय आणि निमशासकीय कार्यालये या भूखंडाच्या जवळ आहेत. सद्य:स्थितीत पश्चिम महाराष्ट्र आणि पुण्यात कर्करोग उपचारांसाठी एकही शासकीय रुग्णालय नाही. त्यामुळे या जागेवर ते उभारण्यासाठी पोटभाडेकरार रद्द करून हा भूखंड कर्करोग रुग्णालयासाठी द्यावा,’ अशी मागणी उज्ज्वल केसकर यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

Web Title: A cancer hospital should be built on 2 acres of land in Mangwar Peth; Former BJP corporators demand from Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.