कॅन्सर झालेल्या जिभेला मिळाला छातीच्या स्नायूंचा आधार; डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया यशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 03:30 PM2022-11-08T15:30:11+5:302022-11-08T15:30:49+5:30
जिभेचा कॅन्सर झालेल्या एका ५६ वर्षीय व्यक्तीची जीभ कापून त्याजागी नवीन जीभ तयार करण्यात डॉक्टरांना यश मिळाले
पुणे : तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे जिभेच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. अशात जिभेचा कॅन्सर झालेल्या एका ५६ वर्षीय व्यक्तीची जीभ कापून त्याजागी नवीन जीभ तयार करण्यात डॉक्टरांना यश मिळाले आहे. ही नवीन जीभ या व्यक्तीच्या छातीच्या स्नायूपासून तयार केली आहे.
खासगी रुग्णालयातील जनरल आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. प्रफुल्ल प्रधान, कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. कमलेश बोकिल आणि प्लास्टिक ॲण्ड कॉस्मेटिक सर्जन डॉ. अमित मुळे यांनी एकत्रितपणे ही शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे.
सुधीर कांबळे (रा. सांगली) या रुग्णास काही महिन्यांपूर्वी त्यांच्या जिभेला जखम झाली होती. जखम लहान असल्याने रुग्णाने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही; परंतु हळूहळू ही जखम वाढत गेल्याने त्यांनी स्थानिक डॉक्टरांना दाखवले; मात्र काहीही फरक पडला नाही. तोंडातील व्रण आणि जखम वाढल्याने त्यांना तोंड उघडता येत नव्हते. कुटुंबीयांनी त्यांना पुण्यात आणले.
याठिकाणी जनरल आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. प्रफुल्ल प्रधान यांच्याकडे त्यांच्यावर उपचार सुरू झाले. बायोप्सी चाचणीत रुग्णाला जिभेचा कर्करोग असल्याचे निदान झाले. त्यानुसार डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्याद्वारे टोटल ग्लॉसेक्टॉमी शस्त्रक्रिया करून रुग्णाची जीभ काढून टाकली आणि नवीन जीभ तयार केली.
डॉ. प्रफुल्ल प्रधान म्हणाले की, तोंडात जखम झाल्याने रूग्ण उपचारासाठी आला होता. अशा स्थितीत तोंडात झालेल्या जखमेचं नेमकं कारण जाणून घेण्यासाठी बायोप्सी चाचणी केली. या चाचणी अहवालात रुग्णाला जिभेचा कर्करोग असल्याचं निदान झालं. हा कर्करोग जिभेच्या उजव्या बाजूला सुरू होऊन डाव्या बाजूला पसरला होता.
डॉ. कमलेश बोकली म्हणाले की, तोंडाच्या कर्करोगाची समस्या सर्वात मोठी आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे तोंडाच्या खास करून जिभेच्या कर्करोगाचे रुग्ण अधिक आढळून येत आहेत. ३० ते ५० वयोगटातील पुरुषांमध्ये जिभेच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. लोकांनी सिगारेट, गुटखा, मावा व इतर तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहिल्यास तोंडाचा व जिभेचा कॅन्सर टाळता येईल.