एका दिवसात कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत दाखल खटला निकाली काढला
By नम्रता फडणीस | Published: April 17, 2023 03:25 PM2023-04-17T15:25:15+5:302023-04-17T15:25:34+5:30
कौंटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत पुण्याच्या न्यायालयात पत्नीने केस आणि पतीसह सासू सासरे व विवाहित नणंदेविरूद्ध गुन्हा दाखल केला होता
पुणे : पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणांवरून वाद होऊ लागले, त्यामुळे ती हैद्राबादवरून पुण्यात माहेरी आली. पत्नीने कौटुंबिक हिंसाचार संरक्षण कायदा आणि सी आर पी सी कलम 125 अन्वये केस दाखल केली. पतीसह सासू सासरे व विवाहित नणंद यांच्याविरूद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दरम्यान, दोघांना हैद्राबाद कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घट्स्फोट मंजूर झाल्यानंतर फिर्यादी पत्नीची साक्ष नोंदवित , कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत पुण्यातील न्यायालयात प्रलंबित खटला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी. एस. गायगोळे यांनी एका दिवसात निकाली काढला. याप्रकरणातून पतीसह सासू सासरे व विवाहित नणंद यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
निलेश आणि सीमा (नाव बदललेले आहे) यांचे लग्न 2018 मध्ये झाले. लग्नानंतर ती पुण्याहून हैद्राबादला नांदायला गेली. मात्र किरकोळ कारणावरून होणा-या भांडणात त्यांचे नाते फिस्कटले. ती माहेरी निघून आली. पतीने हैद्राबाद कौंटुंबिक न्यायालयात वैवाहिक संबंध पुनसर््थापनेकरिता अर्ज दाखल केला. पण, तिने रागाच्या भरात कौंटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत पुण्याच्या न्यायालयात केस आणि पतीसह सासू सासरे व विवाहित नणंदेविरूद्ध गुन्हा दाखल केला. नवरा व इतर नातेवाईकांना सत्र न्यायालय पुणे यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्यानंतर मध्यस्थी मार्फत वकिलांच्या प्रयत्नांनी नवरा बायको ह्यांनी आपापसात तडजोड करून संमतीने घटस्फोट घेण्याचे ठरवले आणि हैद्राबाद न्यायालयाने त्यांचा घट्स्फोट मंजूर केला. पुणे येथे प्रलंबित असलेल्या 498अ केस मध्ये नवरा सासू सासरे आणि विवाहित नंणद हजर झाले व फिर्यादी पत्नीची साक्ष नोंदवित तिघांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. आरोपी नवरा सासू सासरा व विवाहित नंणद यांच्या वतीने अँड अमित राठी आणि अँड रमेश परमार यांनी कामकाज पाहिले व अँड अविनाश पवार यांनी सहाय्य्य केले.