मध्यरात्री लपून झाडांची कत्तल केल्याप्रकरणी पाेलिसांकडून पुण्यातील गेरा बिल्डरवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 07:59 AM2024-06-03T07:59:54+5:302024-06-03T08:00:27+5:30

पिंपरीतील जाॅगिंग ट्रॅकवर १७ मे रोजी घडलेला प्रकार वृक्षमित्रांमुळे आला उघडकीस

A case has been filed against a Gera builder in Pune by the police for killing trees by hiding in the middle of the night | मध्यरात्री लपून झाडांची कत्तल केल्याप्रकरणी पाेलिसांकडून पुण्यातील गेरा बिल्डरवर गुन्हा

मध्यरात्री लपून झाडांची कत्तल केल्याप्रकरणी पाेलिसांकडून पुण्यातील गेरा बिल्डरवर गुन्हा

पुणे :  पिंपरी चिंचवड महापालिका वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी न घेता वृक्षतोड केल्याप्रकरणी गेरा इम्पिरियल गेट वे, गेरा डेव्हलपमेंट प्रा. लि. आणि कुमार गेरा, विजय कल्याणकर, बालाजी खांडेकर यांच्यावर पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे. हा सर्व प्रकार १७ ते १८ मे रोजी घडल्याचे उघडकीस आले आहे.

नाशिक फाटा ते भोसरी रस्त्यावर वीज कंपनीचे कार्यालय ते सीआयआरटीच्या जाॅगिंग ट्रॅकवर दोन वृक्षमित्रांमुळे हा प्रकार उघडकीस आला. संशयितांनी वृक्ष प्राधिकरण समितीची कोणतीही परवानगी न घेता वृक्षतोड केली. त्यानंतर पंचनामा करून महापालिकेने नोटीस बजावली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाचे सहायक सुरेश घोडे (रा. गुलाबपुष्प उद्यान, नेहरूनगर) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत गुरव तपास करीत आहेत. मोरवाडी येथील दिवाणी न्यायालयात याबाबत खटला चालविला जाईल. 

फिर्यादीत काय म्हटले आहे... 
घोडे यांनी फिर्यादीत म्हटले की, दि. १८ मे रोजी वृक्षमित्र संजय औसरमाल आणि सागर कसबे यांनी संबंधित ठिकाणी वृक्षतोड झाल्याचे फोनवरून सांगितले. त्यानंतर सकाळी दहा वाजता उद्यान विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. एकूण दहा झाडे तोडल्याचे निदर्शनास आले. त्यातील काही झाडे मुळांसह आणि काही झाडांच्या फांद्या तोडल्या होत्या. काही झाडांच्या खोडाला इजा पोहोचवून, वाळलेले वृक्ष तोडून नुकसान केल्याचे आढळले. तेथे गेरा इम्पिरियल गेट वे आणि गेरा बिल्डरचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्याचे मालक कुमार गेरा, विजय कल्याणकर,  बालाजी खांडेकर असून त्यांना वृक्षतोडीबाबत विचारले असता त्यांनी झाडे तोडण्याची कोणतीही परवानगी घेतली नसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांत तक्रार दिली. संबंधितांनी विनापरवाना वृक्षतोड करून सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान केले आहे. 

या कलमान्वये गुन्हा दाखल
महाराष्ट्र झाडे तोडणे (नियमन) अधिनियम १९६४ कलम ३/१, महाराष्ट्र झाडे तोडणे (नियमन)  अधिनियम १९६४ कलम ४ आणि  महाराष्ट्र (नागरिक क्षेत्र) झाडांचे सर्वेक्षण व जतन अधिनियम १९७५ कलम २१/१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

काय आहे नियम...
महापालिका क्षेत्रातील झाडांची वृक्षतोड करण्यासाठी महापालिका उद्यान विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. विनापरवाना झाड तोडल्यास ५० हजार रुपये दंड, विनापरवाना झाड छाटल्यास १० हजार रुपये किंवा दोन वर्षांचा कारावास, अशी तरतूद आहे. 

परवानगी न घेता वृक्षतोड केल्याबाबत गेरा इम्पिरियल गेट वे, गेरा डेव्हलपमेंट प्रा. लि. व कुमार गेरा, विजय कल्याणकर, बालाजी खांडेकर यांना नोटीस दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  
- रविकिरण घोडके, सहायक आयुक्त उद्यान विभाग.

Web Title: A case has been filed against a Gera builder in Pune by the police for killing trees by hiding in the middle of the night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.