पुण्यात आंदोलन करणाऱ्या अडीच हजार रिक्षाचालकांवर गुन्हा दाखल
By विवेक भुसे | Published: November 29, 2022 04:55 PM2022-11-29T16:55:29+5:302022-11-29T16:56:20+5:30
आर टी ओ कार्यालयाबाहेर विविध रिक्षा संघटनांनी सोमवारी ठिय्या आंदोलन केले होते. त्यासाठी त्यांनी संपूर्ण परिसरात रिक्षा उभ्या करुन वाहतूक अडविली होती.
पुणे - बाइक टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करुन ती तात्काळ बंद करावी, या मागणीसाठी आरटीओ समोर ठिय्या आंदोलन करुन रिक्षा चौकात पार्क करुन संपूर्ण आर टीओ चौकातील वाहतूक अडवून शासकीय अधिकाऱ्याच्या आदेशाचा अवमान करणाऱ्या रिक्षा संघटनांच्या नेत्यांसह अडीच हजार रिक्षाचालकांवर पोलिसांनी रात्री उशीरा गुन्हा दाखल केला आहे. बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर, बाबा कांबळे, आनंद अंकुश व इतर २३०० ते २५०० रिक्षाचालकांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आर टी ओ कार्यालयाबाहेर विविध रिक्षा संघटनांनी सोमवारी ठिय्या आंदोलन केले होते. त्यासाठी त्यांनी संपूर्ण परिसरात रिक्षा उभ्या करुन वाहतूक अडविली होती. सकाळी १० वाजता सुरू झालेले हे आंदोलन पालकमंत्री व इतरांच्या आश्वासनानंतर रात्री सव्वाआठ वाजता मागे घेण्यात आले होते. या काळात परिसरातील संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली होती. आंदोलन काळात संपूर्ण चौकातील वाहतूक अडवून स्पीकरवरुन घोषणा देऊन बंदोबस्तावरील अधिकारी व अंमलदार यांनी त्यांना आंदोलन न करण्याबाबत सूचना व आदेश दिले होते. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन शासकीय अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन न करता अवमान केल्याने गुन्हा दाखल करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.