Pune | पुण्यात लाच मागितल्याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 12:24 PM2022-11-25T12:24:21+5:302022-11-25T12:24:52+5:30
लाचेची मागणी केल्याचा गुन्हा कोंढवा पोलिस ठाण्यात दाखल...
पुणे : जमीन वादातील प्रकरणात कारवाई न करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाचेची मागणी केल्या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कोंढवा पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. स्वराज अनंत पाटील असे या सहायक पोलिस निरीक्षकाचे नाव आहे.
याप्रकरणी एका ३८ वर्षांच्या नागरिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदार यांची पत्नी व सासरे यांच्या विरोधात जागेच्या वादासंबंधाने तक्रार अर्ज आला होता. त्याची चौकशी सहायक निरीक्षक स्वराज पाटील यांच्याकडे साेपविण्यात आली होती.
तक्रार अर्जावरून कारवाई न करता सहकार्य करण्यासाठी पाटील यांनी तक्रारदाराकडे दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली. त्याची पडताळणी २५ मे व २ जून रोजी करण्यात आली. त्यात पाटील यांनी दोन लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र, प्रत्यक्ष सापळा कारवाई झाली नव्हती. त्यामुळे लाचेची मागणी केल्याचा गुन्हा कोंढवा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक प्रणेता सांगोलकर तपास करीत आहेत.