पोलिसांच्या कानशिलात मारणार्या भाजपचे आमदार सुनील कांबळेवर गुन्हा दाखल
By विवेक भुसे | Published: January 6, 2024 11:48 AM2024-01-06T11:48:46+5:302024-01-06T11:50:27+5:30
याबाबत शासकीय कर्तव्य पार पाडताना अडथळा निर्माण केल्याबद्दल आमदार सुनील कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे...
पुणे : स्टेजवरुन उतरताना अडखळणार्या आमदाराला सावरले असताना आभार मानण्याऐवजी त्यांच्या कानशिलात आमदार सुनील कांबळे यांनी मारली होती. याबाबत शासकीय कर्तव्य पार पाडताना अडथळा निर्माण केल्याबद्दल आमदार सुनील कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस अंमलदार शिवाजी सरक (वय ३५) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ससून रुग्णालयातील कार्यक्रमादरम्यान शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला.
ससून रुग्णालयातील ११ मजली इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी झाले.
कार्यक्रमाच्या ठिकाणी शिवाजी सरक यांना बंदोबस्तासाठी थांबविण्यात आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर आमदार सुनील कांबळे हे स्टेजवरुन खाली उतरत असताना त्यांचा पाय अडखळला. ते पाहून फिर्यादी हे पुढे होऊन त्यांनी सावरले असताना सुनील कांबळे यांनी डाव्या हाताने त्यांच्या कानशिलात मारली. फिर्यादी यांनी त्यांना पोलीस असल्याचे सांगितले असता त्यांनी फिर्यादी यांना मग काय झाले असे मोठ्याने दरडावून फिर्यादी यांना शासकीय कर्तव्य पार पाडताना अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार तपास करीत आहेत.