वारकऱ्यांकडून टोल घेतल्याने पाटस टोल नाक्यावरील चौघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 03:58 PM2022-07-09T15:58:12+5:302022-07-09T15:59:14+5:30
शासनाच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल...
पाटस (पुणे) : पाटस येथील टोल नाक्यावर वारकऱ्यांकडून नियमबाह्य टोल वसूल करून महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली. याप्रकरणी पाटस टोलनाक्याचे अधिकारी अजयसिंग ठाकूर, सुनील थोरात, विकास दिवेकर, बालाजी वाघमोडे या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जाहीर केले होते की, पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहन चालकांकडून टोल वसूल करू नये. याच बरोबरीने यवतचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी देखील लेखी स्वरुपात पाटस टोलनाका प्रशासनाला शासनाच्या परिपत्रकानुसार कळविले होते की, वारकऱ्यांच्या वाहनांकडून टोल वसूल करू नका. तरीदेखील शुक्रवार (दि. ८) रोजी पाटस टोल नाक्यावर वारकऱ्यांच्या वाहनांकडून टोल वसूल केला जात होता. परिणामी टोल नाक्यावरील येथील कर्मचाऱ्यांनी वारकऱ्यांबरोबर हुज्जत घालत टोल वसूल केला.
यावेळी वारकरी भक्त म्हणत होते की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना टोल माफी केली आहे. यावर पाटस टोल नाका येथील कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एकेरी उल्लेख करून टोल माफी विषयी आम्हाला काहीही कळविण्यात आलेले नाही. यावेळी नाईलाज झाल्याने वारकऱ्यांना टोल दिल्याशिवाय पर्याय उरला नव्हता. पाटस टोल नाक्यावरील हुकूमशाहीची वार्ता सर्वत्र पसरल्यानंतर यवत पोलिसांनी टोल नाका प्रशासनाच्या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.