फसवणूक करणाऱ्या बिल्डरसह चार जणांवर गुन्हा दाखल
By नितीश गोवंडे | Published: October 18, 2023 05:10 PM2023-10-18T17:10:22+5:302023-10-18T17:10:46+5:30
जमिनीच्या मूळ मालकांनी संगनमत करुन अपसिंगकर याच्या फ्लॅटला अनधिकृत, परवानगी शिवाय कुलूप लावले
पुणे : बिल्डरकडून खरेदी केलेल्या फ्लॅटवर मुळ जागा मालकांनी गृह अतिक्रमण केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बांधकाम व्यावसायिकासह चार जणांवर चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार वडगावशेरी येथील टेम्पो चौकातील गौरी हाईट्स येथे मे २०१६ ते ऑक्टोबर २०२३ दरम्यान घडला. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. सचिन रविंद्र अपसिंगकर (३९, रा. खराडी) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शेखर गलांडे, अमोल गलांडे, कविता गलांडे, दाजी गवारे (सर्व रा. वडगावशेरी) आणि बांधकाम व्यावसायिक योगेश सुरेश घंगाळे यांच्यावर आयपीसी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी याप्रकरणी शेखर आणि अमोल गलांडे या दोघांना अटक देखील केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बांधकाम व्यावसायिक योगेश घंगाळे याने २०१२ मध्ये वडगावशेरी येथे मे. योगेश कन्स्ट्रक्शन नावाची बांधकाम साईट सुरु केली होती. या बांधकाम साईटमधील प्लॅट नंबर ३०३ सचिन अपसिंगकर यांनी २५ लाख ८० हजार रुपयांना खरेदी केला होता. बिल्डर जयेश घंगाळे याने या फ्लॅटचा दस्त करुन दिला होता. मात्र, या जमिनीच्या मूळ मालकांनी संगनमत करुन अपसिंगकर याच्या फ्लॅटला अनधिकृत, परवानगी शिवाय कुलूप लावले. आरोपी मूळ जमीन मालकांनी गृह अतिक्रमण केल्याने अपसिंगकर यांनी पैशांची मागणी केली. त्यावेळी आरोपींनी शिवीगाळ करुन पैसे परत न करता आर्थिक फसवणूक केली. यानंतर अपसिंगकर यांनी चंदननगर पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पालवे करत आहेत.