बारामतीत पत्रकारावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांवर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 01:56 PM2022-11-04T13:56:12+5:302022-11-04T13:57:05+5:30

वाढत्या गुन्हेगारीमुळे बारामतीत दहशतीचे वातावरण: चौकशीसाठी पाच जण पोलिसांच्या ताब्यात

A case has been registered against the assailants who fired at the journalist in Baramati | बारामतीत पत्रकारावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांवर गुन्हा दाखल 

बारामतीत पत्रकारावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांवर गुन्हा दाखल 

googlenewsNext

सांगवी (बारामती) : रस्ता ओलांडताना दुचाकी घासल्याच्या वादातून बारामती येथील युवा पत्रकार गणेश जाधव याच्यावर गोळीबार करत साथीदारांवर हल्ला केल्याप्रकरणी शुभम राजपुरे व तुषार भोसले यांच्यासह आठ अज्ञातांविरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋत्विक जीवन मुळीक (वय २१, रा. कुंभरकरवस्ती, वंजारवाडी, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. तर हल्याचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

यातील मुख्य आरोपी शुभम राजपुरे व तुषार भोसले हे फरार झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी एकूण सहा पथके तयार करून शोधमोहीम आखली आहे. अज्ञातांपैकी  पाच जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी दिली.

रस्ता ओलांडताना दुचाकी घासून गेल्याच्या वादातून हा प्रकार घडला होता. शुभम राजपुरे याने ‘तु कोण आमच्यावर दादागिरी दाखविणारा, बारामतीत माझीच दादागिरी चालणार, माझ्याशी पंगा घेणारा बारामतीत अजून पैदा व्हायचा आहे’ असे म्हणत पिस्तुलातून गणेश जाधव याच्या दिशेने दोनवेळा फायरिंग केली होती. दुसऱ्या वेळेस केलेल्या फायरिंगमध्ये एक गोळी गणेशच्या पोटात लागली.

गुरुवारी (दि.३) रोजी सायंकाळी ही घटना घडली असता परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. घडलेल्या या घटनेमुळे बारामती तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. गुरुवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास पेन्सिल चौक ते जळोची रस्त्यावरील चाय चस्का दुकानात फिर्यादी हा त्याचा साथीदार तेजस पवार, स्वप्निल भोसले, रवी माने यांच्यासोबत गेला होता. चहा पिऊन तो रस्ता ओलांडत असताना ट्रीपल सीट आलेली दुचाकी फिर्यादीला घासून गेली.

त्यामुळे फिर्यादीने अरे पुढे पाहून नीट गाडी चालवं, माणसांना मारतो का, अशी विचारणा केली. त्यावर दुचाकी माघारी आणून त्यातील एकाने फिर्यादीला लाथाबुक्यांनी मारहाण केली. फिर्यादीच्या मित्रांनी त्यांची भांडणे सोडवली, परंतु यावेळी साथीदारांना ठार मारण्याची धमकी दिली. तेजस पवार याच्याकडून दुचाकीवरून कट मारणारा मुलगा हा तुषार भोसले असून तो शुभम राजपुरे याचा साथीदार असल्याचे तसेच त्यांची बारामती शहर, एमआयडीसी परिसरात दादागिरी असल्याचे समजले. या घटनेनंतर फिर्य़ादी मित्रांसह तेथून निघून गेले.

काही वेळाने ही बाब गणेश जाधव याला सांगण्यासाठी ते भिगवण रस्त्यावर सहयोग सोसायटीजवळ रिलायन्स पेट्रोलपंपावर आले. सायंकाळी पावणे सातच्या सुमारास ते गणेश जाधव याला चाय चस्का दुकानासमोर घडलेली घटना सांगत होता.दरम्यान  तेथे चार ते पाच दुचाकी आल्या. एका दुचाकीवर शुभम राजपुरे बसला होता. त्यांच्या हातात कोयते होते. शुभम याने तुषार भोसले याला, कोण आहे रे तो, मस्ती आलीय काय, मी बारामतीचा बाप आहे, साल्यांना ठोका असे म्हणाला.

त्यावेळी तुषार भोसले हा कोयता घेवून फिर्यादीच्या अंगावर आला. गणेश जाधव याने मध्यस्थी करत, माझा लहान भाऊ आहे, जाऊ द्या, असे सांगितले असता राजपुरेसोबत आलेल्या अन्य तरुणांनी फिर्यादी व गणेश जाधव यांच्या डोक्यात मारण्यासाठी कोयता उगारला. फिर्यादीने तो हाताने अडवला. फिर्यादी शेजारी उभ्या असलेल्या अतुल भोलानकर याने गणेश जाधव याच्यावर उगारलेला कोयता हाताने अडवून ठेवला.

त्यामुळे चिडलेल्या शुभम राजपुरे याने कमरेला लावलेला पिस्तुल लोड करून गणेश जाधव यास, तु कोण दादा लागून गेलास का, बारामतीत माझीच दादागिरी चालणार, माझ्याशी पंगा घेणारा अजून पैदा व्हायचा आहे असे म्हणत गणेश जाधव याच्या दिशेने फायरिंग केले. परंतु जाधव यांना गोळी लागली नाही. त्यामुळे दुसऱ्यांदा पिस्तुल लोड करत फायरिंग केली.

ती गोळी गणेश जाधव याच्या पोटाजवळ लागली. या घटनेने गणेश जाधव हा खाली कोसळला.त्यानंतर आरडाओरडा करत दहशत निर्माण करत सर्वजण दुचाकीवरून निघून गेले. गोळीबाराच्या आवाजाने पेट्रोलपंपावरील लोकही पळून गेले होते. फिर्य़ादी व अन्य मित्रांनी जाधव याला रक्तबंबाळ अवस्थेत बारामती हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: A case has been registered against the assailants who fired at the journalist in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.