बेहिशोबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी माजी भूमी अभिलेखच्या उपसंचालकासह पत्नीवर गुन्हा दाखल
By नितीश गोवंडे | Published: June 29, 2024 05:42 PM2024-06-29T17:42:27+5:302024-06-29T17:43:06+5:30
आरोपी दादाभाऊ तळपे यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत पुणे एसीबी कार्यालयाकडून उघड चौकशी करण्यात आली होती....
पुणे : बेहिशोबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी नागपूर भूमी अभिलेखच्या तत्कालीन उपसंचालकासह त्यांच्या पत्नीवर येरवडा पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून शनिवारी (दि. २९) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर भूमी अभिलेखचे सेवानिवृत्त उपसंचालक दादाभाऊ सोनू तळपे (६२) आणि त्यांच्या पत्नी कल्पना दादाभाऊ तळपे (५८, दोघे रा. हर्स हेरिटेज, शास्त्रीनगर, येरवडा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुणे एसीबीचे पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपी दादाभाऊ तळपे यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत पुणे एसीबी कार्यालयाकडून उघड चौकशी करण्यात आली होती. तळपे यांनी संपादित केलेल्या मालमत्ता कायदेशीर पद्धतीने संपादित केल्या आहेत की नाही? याबाबत त्यांना वेळोवेळी संधी देऊन माहिती देण्यास सांगितले होते. मात्र, तळपे यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत उपयुक्त पुरावे ते सादर करु शकले नाहीत. त्यांनी भूमी अभिलेख विभागात कार्यरत असताना आपल्या कार्यकाळात कायदेशीर उत्पन्नापेक्षा स्वत:च्या व पत्नीच्या नावे २८ लाख ५२ हजार ५४१ (ज्ञात उत्पन्नापेक्षा १८.७४ टक्के) किमतीची अपसंपदा भ्रष्ट मार्गाने जमवल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
बेहिशोबी मालमत्ता संपादित करण्यासाठी दादाभाऊ तळपे यांना त्यांची पत्नी कल्पना तळपे यांनी अपप्रेरणा दिली. तसेच गुन्हा करण्यास प्रोत्साहित केले. त्यामुळे पुणे एसीबीने दोघांवर येरवडा पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम १३(१)(ई), १३(२) सह भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, भादंवि १०९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक श्रीराम शिंदे करत आहेत.