पुण्यात जामीनदाराच्या आत्महत्येप्रकरणी दोन पोलीस कर्मचार्‍यांसह तिघांवर गुन्हा दाखल

By विवेक भुसे | Published: September 13, 2022 09:46 AM2022-09-13T09:46:40+5:302022-09-13T09:49:27+5:30

आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल..

A case has been registered against three persons including two policemen in connection with the suicide of a surety in Pune | पुण्यात जामीनदाराच्या आत्महत्येप्रकरणी दोन पोलीस कर्मचार्‍यांसह तिघांवर गुन्हा दाखल

पुण्यात जामीनदाराच्या आत्महत्येप्रकरणी दोन पोलीस कर्मचार्‍यांसह तिघांवर गुन्हा दाखल

Next

पुणे : कर्जदाराने हप्ते थकविल्याने त्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी दबाव आणून पोलिसांनी अटक करण्याची भीती दाखविली. या त्रासाला कंटाळून जामिनदाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी दोघा पोलीस कर्मचार्‍यांसह कर्जदारावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

किरण भातलावंडे (रा. गवळी वस्ती, मांजरी) आणि सहायक पोलीस फौजदार भाग्यवान ज्ञानदेव निकम व पोलीस हवालदार सचिन रामचंद्र बरकडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दोघेही पोलीस कर्मचारी समर्थ पोलीस ठाण्यात नेमणूकीला आहेत.

राजेंद्र राऊत असे आत्महत्या केलेल्या जामीनदाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची कन्या वैष्णवी राजेंद्र राऊत (वय २३, रा. नाना पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना नाना पेठेतील राऊत यांच्या घरी सोमवारी सकाळी ६ वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण भातलावंडे हा फिर्यादी यांचे वडिल राजेंद्र राऊत यांच्या मित्र होता. किरण याने रघुवीर बिजनेस प्रा. लि. हैदराबाद यांच्याकडून टाटा सुमो विक्टा ही गाडी घेतली होती. त्यासाठी घेतलेल्या कजार्साठी राजेंद्र राऊत हे जामीनदार होते. परंतु किरण याने कर्जाचे हप्ते  न भरल्यामुळे सहायक पोलीस फौजदार भाग्यवान निकम व हवालदार सचिन बरकडे हे राऊत यांच्याकडे वारंवार कोर्टाचे वॉरंट बजावण्यासाठी येत होते. ते त्यांना अटक करण्याची भीती दाखवत होते. अटक होऊ नये, यासाठी त्यांनी वेळोवेळी ७ ते ८ हजार रुपये दिले होते. या सर्व त्रासामुळे राऊत यांनी किरण याला कर्ज फेडण्यास सांगितले. तेव्हा किरण याने कर्ज फेडण्यास नकार देऊन धमकी दिली.

या त्रासाला कंटाळून राजेंद्र राऊत यांनी सोमवारी सकाळी ६ वाजता घराबाहेरील पॅसेजमध्ये नायलॉनचे दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे व सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांनी  घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक माळी तपास करीत आहेत.

Web Title: A case has been registered against three persons including two policemen in connection with the suicide of a surety in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.