टीईटी गैरव्यवहारातील आरोपी तुकाराम सुपेवर अपसंपदा प्रकरणी गुन्हा दाखल
By विवेक भुसे | Published: December 6, 2023 05:50 PM2023-12-06T17:50:27+5:302023-12-06T19:47:30+5:30
शिक्षक पात्रता परीक्षेत लाच घेऊन विद्यार्थ्यांना पास केल्याचा ठपका तुकाराम सुपे याच्यावर ठेवण्यात आला आहे
पुणे: टीईटी गैरव्यवहार प्रकरणातील प्रमुख आरोपी व राज्य परीक्षा परिषदेचा तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे याच्यावर अपसंपदा बाळगल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. पुणे सायबर पोलिसांनी टीटीई गैरव्यवहार उघडकीस आणला होता. तुकाराम सुपे याला १७ डिसेंबर २०२१ रोजी सायबर पोलिसांनी अटक केली होती. शिक्षक पात्रता परीक्षेत लाच घेऊन विद्यार्थ्यांना पास केल्याचा ठपका तुकाराम सुपे याच्यावर ठेवण्यात आला आहे.
यावेळी पोलिसांनी घातलेल्या छाप्यात सुपे याच्या घरी व इतरत्र २ कोटी ८७ लाख ९९ हजार ५९० रुपयांची रोकड आढळून आली. तसेच ७२ लाख रुपयांचे १४५ तोळे सोने सापडले होते. अशी ३ कोटी ५९ लाख ९९ हजार ५९० रुपयांच्या मालमत्तेविषयी सुपे कोणताही खुलासा करु शकले नाही. त्यामुळे त्यांनी सरकारी अधिकारी असताना भ्रष्ट मार्गाने ही मालमत्ता मिळविली असून ती वैध उत्पन्नापेक्षा अधिक असल्याचे चौकशी निष्पन्न झाले. १९८६ ते २५ डिसेंबर २०२१ या कालावधीतील सुपे यांच्या मालमत्तेचे परिक्षण करण्यात आले. त्यानुसार प्राथमिक तपासानुसार त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस निरीक्षक श्रीराम शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिस उपअधीक्षक माधुरी भोसले तपास करीत आहेत.
याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितले की, सायबर पोलिसांनी जप्त केलेली मालमत्ता ही अपसंपदा असल्याचे निष्पन्न झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या पत्नीच्या नावावरही जमीन असून अन्य मालमत्तेची चौकशी सुरु आहे.
शिक्षणाधिकाऱ्याकडे ५.८५ कोटी अपसंपदा
सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार याच्याकडे उत्पन्नापेक्षा ५ कोटी ८५ लाख ८५ हजार ६२३ रुपयांची अपसंपदा आढळून आली आहे. याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण आनंद लोहार (वय ५०), पत्नी सुजाता किरण लोहार (वय ४४), मुलगा निखिल किरण लोहार (वय २५, सर्व रा. पाचगाव, ता. करवीर, कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. १५ नोव्हेबर १९९३ ते ३१ ऑक्टोबर २०२२ दरम्यानच्या काळातील लोहार याच्या उत्पन्नापेक्षा १११ टक्के अधिक मालमत्ता आढळून आली. सांगलीचे सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी विष्णु मारुतीराव कांबळे याच्याकडे ८२ लाख ९९ हजार ९५२ रुपयांची अपसंपदा आढळून आली. विष्णु कांबळे (वय ५९) आणि पत्नी जयश्री कांबळे (सर्व रा. बार्शी, सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.