'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देणाऱ्या PFI कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाही, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 06:45 PM2022-09-25T18:45:50+5:302022-09-25T21:38:31+5:30
सुप्रीम कोर्टाने राजद्रोहाच्या कायद्याला मे महिन्यात स्थगिती दिली होती
पुणे : पुण्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी आंदोलन केले होते. यावेळी 'पाकिस्तान झिंदाबाद' घोषणा दिल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. 'पाकिस्तान झिंदाबाद' अशा घोषणा दिल्या का, याचा तपास करण्यात येणार असून, बेकायदेशीर जमाव जमविल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सुप्रीम कोर्टाने राजद्रोहाच्या कायद्याला मे महिन्यात स्थगिती दिली होती, त्यामुळे पोलिसांनी पीएफआय कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही.
पुणेपोलिसांकडून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. पण, सुप्रीम कोर्टाने राजद्रोहाच्या कायद्याला मे महिन्यात स्थगिती दिली होती. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीविरुद्ध राजद्रोहाच्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करता येणार नाही, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. यामुळेच पुणे पोलिसांनी कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही.
राजद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला नसला, तरीदेखील पीएफआय कार्यकर्त्यांच्या विरोधात कलम 153 म्हणजेच, सरकारी कामात अडथळा आणणे, कलम 109 अंतर्गत चीतावणीखोर वक्तव्य करणे, कलम 120 ब अंतर्गत कट रचणे, अशा कलमानवय गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बंडगार्डन पोलिस ठाण्यात आता ही तीन कलम आधीच्या गुन्ह्यात नव्याने जोडली आहेत.
पुणे पोलिसांनी दिला होता इशारा
सोशल मीडिया मधून जे व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते एकत्र करून आम्ही त्याचे फॉरेन्सिक करणार आहोत. बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीत जी घटना घडली त्याबद्दल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडिया वरुन जे काही व्हिडिओ आहेत ते तपासातून निष्पन्न होत आहेत. त्या अनुषंगाने या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू आहे. ज्या गोष्टी तपासात निष्पन्न होतील जे काही कलम असतील ते आम्ही ऍड करणार आहोत. पोलिसांची कडक भूमिका आहे जे लोक निष्पन्न होतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.