नागरिकांना मारणे टोळीविरुद्ध तक्रार करण्यासाठी गुन्हे शाखेत एक कक्ष सुरू होणार - अमितेश कुमार
By नम्रता फडणीस | Updated: February 25, 2025 19:46 IST2025-02-25T19:45:24+5:302025-02-25T19:46:03+5:30
तक्रार करणाऱ्या नागरिकांचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले

नागरिकांना मारणे टोळीविरुद्ध तक्रार करण्यासाठी गुन्हे शाखेत एक कक्ष सुरू होणार - अमितेश कुमार
पुणे: कोथरूड भागात संगणक अभियंता देवेंद्र जोग यांना मारहाण करुन खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मारणेसह साथीदारांविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास कोथरूड पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. नागरिकांना मारणे टोळीविरुद्ध तक्रार करण्यासाठी गुन्हे शाखेत एक कक्ष सुरू करण्यात येणार असून, मारणे विरुद्ध तक्रार असल्यास नागरिकांनी गुन्हे शाखेकडे तक्रार करावी, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे या कक्षाची जबाबदारी सांभाळणार आहेत. तक्रार करणाऱ्या नागरिकांचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.
गुन्हे शाखेकडून ७४ ठिकाणी छापे
गुन्हे शाखेच्या पथकाकडून मंगळवारी ७४ ठिकाणी छापे टाकण्यात आले. मारणे याने कोथरूड मधील शास्त्रीनगर भागात केलेल्या घराच्या बांधकामाची माहिती घेण्यात आली आहे. तसेच मारणे याच्यासह साथीदारांच्या मालमत्तांची माहिती पोलिसांकडून संकलित करण्यात येत असून, ते वापरत असलेल्या वाहनांची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाकडून घेण्यात आली आहे.
३७ वर्षात २८ गुन्हे, दोनदा तडीपार, मोक्काची कारवाई
गुंड गजा मारणे याच्यावर गेल्या ३७ वर्षात तब्बल २८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. राजकीय वरदहस्त असलेल्या या गुंडाला दोनदा तडीपार केले होते. तसेच यापूर्वी चार वेळा मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर त्याच्या समर्थकांनी ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’वर त्याची आलिशान कारमधून भव्य मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीद्वारे त्याने एकप्रकारे पोलिसांना शह दिल्याचे मानले गेले.
वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात २८ गुन्हे दाखल
गजा मारणे याच्यावर आतापर्यंत डेक्कन, कोथरूड, सासवड, दत्तवाडी, पौड, कामोठा, शिरगाव, हिंजवडी, भारती विद्यापीठ पोलिस ठाणे अशा वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात २८ गुन्हे दाखल आहेत. पुढे एकेकाळचा मित्र असलेला नीलेश घायवळ याच्याशी गजा मारणेचे शत्रुत्व निर्माण झाले. बाबा बोडके याच्याशी देखील त्याचे शत्रुत्व निर्माण झाले. त्यातून या टोळ्यांमध्ये टोळीयुद्ध भडकले होते.