एकमेकांकडे बघण्याच्या रागातून महाविद्यालयीन तरुणाचा कोयत्याने खून, दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 01:53 PM2024-12-04T13:53:08+5:302024-12-04T13:53:36+5:30
एक महिन्यापूर्वी दोघांमध्ये एकमेकांकडे बघण्यावरून वाद झाला, त्यानंतर साथीदाराला सोबत घेऊन हल्ला केला
पुणे: किरकोळ वादासह एकमेकांकडे बघण्याच्या रागातून दोघांनी महाविद्यालयीन मुलावर कोयत्याने वार करून त्याचा खून केला. या प्रकरणी दोन्ही आरोपींना वानवडी पोलिसांनी अटक केली आहे.
यश सुनील घाटे (वय १७, रा. रामटेकडी) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. साहिल लतीफ शेख (वय १८) आणि ताहीर खलील पठाण (वय १८, दोघेही रा. रामटेकडी हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. प्रज्वल सुनील घाटे (वय २०) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही धक्कादायक घटना मंगळवारी (दि. ३) सकाळी सातच्या सुमारास वानवडीतील रामटेकडी परिसरात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश आणि आरोपी रामटेकडी परिसरात राहायला असून, एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत हाेते. एक महिन्यापूर्वी यश आणि साहिल यांच्यात एकमेकांकडे बघण्यावरून वाद झाला होता. त्याचा राग साहिलला आला होता. त्याच रागातून त्याने ३ डिसेंबरला साथीदार ताहिरला बोलावून घेत यशवर हल्ला करण्यासाठी कोयत्याची जमवाजमव केली. दरम्यान, मंगळवारी (दि. ३) सकाळी सातच्या सुमारास यश आणि त्याचा मित्र आदित्य चव्हाण, रेहान पठाण, श्रेयश शिंदे असे जामा मशीदसमोरून कॉलेजला चालले होते. त्याचवेळी परिसरात दबा धरून बसलेल्या साहिल आणि ताहिरने यशवर कोयत्याने वार केला. गंभीर जखमी झालेल्या यशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त आर. राजा, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पतंगे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर काही वेळातच आरोपींना ताब्यात घेत अटक केली.