आढळरावांची राष्ट्रवादीशी सलगी वाढली? दिलीप मोहिते पाटलांसोबत रंगल्या गप्पा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 02:58 PM2023-04-08T14:58:58+5:302023-04-08T15:05:04+5:30

शिवाजीराव आढळराव पाटलांची राष्ट्रवादीच्या नेत्यांशी वाढलेली सलगी लक्ष वेधून घेत आहे...

A colorful chat between Shivaji Rao Adha Rao and Dilip Mohite Patil | आढळरावांची राष्ट्रवादीशी सलगी वाढली? दिलीप मोहिते पाटलांसोबत रंगल्या गप्पा

आढळरावांची राष्ट्रवादीशी सलगी वाढली? दिलीप मोहिते पाटलांसोबत रंगल्या गप्पा

googlenewsNext

- विलास शेटे

मंचर (पुणे) : कट्टर राजकीय वैर असलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व आमदार दिलीप मोहिते पाटील हे एका विवाह समारंभाच्या निमित्ताने एकत्र येत मनमोकळ्या गप्पा मारताना दिसले. त्यामुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आढळराव पाटील लोकसभेला राष्ट्रवादीचे उमेदवार असू शकतात, अशी चर्चा होत असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांशी त्यांची वाढलेली सलगी लक्ष वेधून घेत आहे.

वर्षभरावर लोकसभा निवडणूक आली आहे. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणे पाहता शिरूरमधून कोण निवडणूक लढविणार, याचे आडाखे बांधले जात आहेत. विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा मतदारसंघात फारसा संपर्क नाही. त्यांच्यावर राष्ट्रवादीमधील काहीजण नाराज आहेत, अशी चर्चा आहे. अशातच कोल्हे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू आहेत. कोल्हे यांनी त्याला दुजोरा दिला नसला तरी भाजपचे नेते त्याबाबत वक्तव्य करून सस्पेन्स निर्माण करत आहेत. दुसरीकडे शिंदे गटात सामील झालेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. मागील पराभवाचे उट्टे त्यांना काढायचे आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणावर निधी आणून विकासकामे मार्गी लावली आहेत. आढळराव पाटील यांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. असे असताना भाजपने शिरूर लोकसभा मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले आहे.

आढळरावांचा 'प्लॅन बी'?

केंद्रीय मंत्र्यांचे दौरे झाले आहेत. शिरूरची जागा भाजप स्वतः लढणार की शिंदे गटाला सोडणार, याबाबत सस्पेन्स कायम आहे. दुसरीकडे आढळराव पाटील यांनी प्लॅन बी तयार ठेवल्याचे म्हटले जाते. यदाकदाचित शिवसेना-भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळाली नाही तर ते राष्ट्रवादीचे उमेदवार असू शकतात, अशीही चर्चा सुरू आहे. कोल्हे यांच्याबाबतची नाराजी पाहता, राष्ट्रवादीने दुसऱ्या उमेदवाराचा शोध सुरू केला तर आढळराव पाटील हा पर्याय असू शकतो, असे राजकीय जाणकार सांगतात. या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र ओझर या ठिकाणी पार पडलेल्या विवाह समारंभात आढळराव पाटील व राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील गप्पांची रंगलेली मैफल चर्चेला वाव देऊन गेली.

आढळराव पाटील व आमदार मोहितेंच्या मनमोकळ्या गप्पा-

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभापती वसंतराव भालेराव यांच्या मुलाचा विवाह श्रीक्षेत्र ओझर येथे पार पडला. भालेराव यांचे सर्वच पक्षांत स्नेहाचे संबंध असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट), भाजप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने विवाह समारंभाला उपस्थित होते. विशेष म्हणजे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे सपत्नीक उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर वळसे पाटील, आढळराव पाटील व आमदार मोहिते शेजारी शेजारी बसले होते. आढळराव पाटील व मोहिते यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. खेड पंचायत समितीच्या नवीन इमारतीवरून झालेला वाद अगदी विधानसभेपर्यंत पोहोचला होता. दोघांनी एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडली नाही. मात्र, विवाह समारंभात वेगळेच चित्र पाहायला मिळाले. आढळराव पाटील व आमदार मोहिते हे मनमोकळ्या गप्पा मारत होते.

वळसे पाटलांकडूनही आढळरावांचा उल्लेख-

विवाह समारंभाला उपस्थित असणाऱ्यांच्या नजरेतून हे सुटले नाही. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वधू-वरांना शुभेच्छा देताना आढळराव पाटील यांचा आवर्जून उल्लेख केला. ओझर येथील श्री विघ्नहर सांस्कृतिक भवनचा उल्लेख करून लांडेवाडी येथे आढळराव पाटील यांनी मोठे सभागृह बांधले आहे. मात्र, आम्हाला अजूनपर्यंत हे सभागृह पाहण्याची संधी मिळाली नाही. असेच सभागृह अवसरी खुर्द येथे तयार होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

शिरूरमध्ये आढळराव राष्ट्रवादीतून लढणार?

वळसे पाटील यांनीही आढळराव पाटील यांच्याबरोबर गप्पा मारल्या. बदलती राजकीय समीकरणे पाहता उपस्थित वऱ्हाडी मंडळी या गप्पांकडे वेगळ्या नजरेने पाहू लागली आहेत. नक्की कुठल्या विषयावर चर्चा झाली, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. परंतु, आढळराव पाटील यांच्याशी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी मारलेल्या गप्पा पाहता, त्यांना राष्ट्रवादीने सॉफ्ट कॉर्नर दिला आहे का? अशीही चर्चा उपस्थितमध्ये रंगली. त्यामुळे लोकसभेला आढळराव पाटील हे सुद्धा राष्ट्रवादीचे उमेदवार असू शकतात, अशी चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे.

Web Title: A colorful chat between Shivaji Rao Adha Rao and Dilip Mohite Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.