बांधकामाच्या अंडर ग्राऊंड पाण्याच्या टाकीत पडली गाय; दोन तासाच्या अथक प्रयत्नांनी केली सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 02:09 PM2022-07-08T14:09:13+5:302022-07-08T14:37:54+5:30
घटनेची माहिती मिळताच कात्रज अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली
धनकवडी : धनकवडीतील विश्वराज विहार सोसायटी जवळ खाजगी मालकीच्या बंद पडलेल्या बांधकामाच्या अंडर ग्राऊंड पाण्याच्या टाकीत चक्क गाय पडल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार भारती विद्यापीठ येथील महाराणा प्रताप चौकात शुक्रवारी (दि.८) सकाळी ९.०० वाजता घडला.
घटनेची माहिती मिळताच कात्रज अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तातडीने बचाव कार्य हाती घेण्यात आले. गॅस कटर च्या साह्याने पाण्याच्या टाक्याच्या लोखंडी जाळ्या कट करण्यात आल्या. त्यानंतर गाईच्या शिंगाला व मागील बाजूला दोरीच्या साह्याने बांधून दोन तासांच्या अथक प्रयत्नांती त्या गाईला तेथून सुरक्षित पणे बाहेर काढण्यात यश आले.
कात्रज अग्निशमन दलाचे तांडेल महादेव मांगडे, तांडेल आनंददास, चालक गणेश भंडारे, फायरमन विजय स्वामी, प्रसाद कदम, पंकज इंगवले, प्रतिक शिर्के, निलेश तागुंदे, धिरज जगताप, सागर शिर्के, आणि मध्यवर्ती अग्निशमन दलाच्या जवानांनी हे बचाव कार्य केले.