पुण्यात डॉक्टर महिलेचा भर रस्त्यात विनयभंग; आरोपी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 01:40 PM2022-09-05T13:40:47+5:302022-09-05T13:41:32+5:30
३१ वर्षांच्या महिला डॉक्टरने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली...
पुणे : भर रस्त्यात गेटवर येऊन लग्नाची मागणी करून अश्लील वर्तन करीत महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नास नकार दिल्याने कर्जाचे हप्ते भरणे थांबवून ४ लाखांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी एका ३१ वर्षांच्या महिला डॉक्टरने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी डॉ. इम्रान इलाही मुलाणी (वय ४१, रा. सांगली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कोरेगाव पार्क येथील नामांकित हॉस्पिटलच्या गेटबाहेर ४ ऑक्टोबर २०१९ ते १६ ऑगस्ट २०२१ दरम्यान घडला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी डॉ. मुलाणी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. मुलाणी याने फिर्यादी यांच्या नावे २०१९ मध्ये ४ लाख ७ हजार ५३२ रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले. १६ ऑगस्ट २०२१ रोजी रुबी हॉस्पिटलच्या बाहेर गेटवर आला. त्याने फिर्यादी यांना लग्नाची मागणी घातली असता त्यांनी नकार दिला. त्यावर आरोपीने फिर्यादीस जवळ ओढून त्यांच्याशी मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. तसेच फिर्यादी यांनी पोलिसात तक्रार करेल, असे म्हणताच फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर कर्जाचे हप्ते भरणे बंद केले. त्यामुळे फिर्यादी यांना ३ लाख ८५ हजार रुपयांचे कर्ज भरायला लावून फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक कुलकर्णी तपास करीत आहेत.