Heavy Rain: पुणेकरांच्या डोक्यावर विद्ध्वंसक ढग; म्हणूनच वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 01:34 PM2023-04-16T13:34:27+5:302023-04-16T13:35:22+5:30

दिवसा अंगाची लाही लाही आणि सायंकाळी वरुणराजाची बरसात, असे चित्र पुण्यात मागील काही दिवसांपासून सुरू

A destructive cloud over the heads of Punekars Hence the heavy rain with gale force winds | Heavy Rain: पुणेकरांच्या डोक्यावर विद्ध्वंसक ढग; म्हणूनच वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

Heavy Rain: पुणेकरांच्या डोक्यावर विद्ध्वंसक ढग; म्हणूनच वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

googlenewsNext

श्रीकिशन काळे

पुणे : दिवसा अंगाची लाही लाही आणि सायंकाळी वरुणराजाची बरसात, असे चित्र पुण्यात मागील काही दिवसांपासून सुरू आहे. हा अनुभव क्युम्युलोनिंबस या ढगांमुळे मिळत आहे. या ढगांची भली मोठी उंच इमारत आकाशात साकारते आणि त्याने कमी वेळेत अधिक पाऊस पडण्याची किमया होते. विद्ध्वंस करणारा ढग म्हणून या ढगाची ओळख आहे. त्याचेच राज्य सध्या पुण्याच्या आकाशावर चालत आहे.

दोन दिवसांपूर्वीच पाषाण आणि शिवाजीनगरला सायंकाळी कमी वेळेत प्रचंड वादळी- वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. त्याला कारण देखील हेच क्युम्युलोनिंबस ढग आहे. आकाशात वेगवेगळ्या उंचीवर हे ढग असतात. सिरस प्रकारचे ढग वरच्या ढगांत मोडतात. आकाशात सर्वात उंच हेच ढग दिसतात. मध्यम उंचीच्या क्युम्युलस ढगाला आल्ट्रोक्युम्युलस म्हणतात. मध्यम उंचीच्या स्ट्रॅटस ढगाला आल्ट्रोस्टॅट्रस म्हणतात. आपल्या देशातील माॅन्सूनचे ढग याच प्रकारचे असतात. जेव्हा क्युम्युलस ढग एका थरासारखे बनतात तेव्हा त्यांना स्ट्रॅटोक्युम्युलस म्हणतात.

ढगाचे प्रकार माहीत आहेत का?

- बहुतेक वेळा आकाशात अनेक ढग दिसतात. सामान्यपणे दिसणारे ढग हे क्युम्युलस प्रकारचे असतात. ते कापसाच्या ढिगासारखे दिसतात. आकाश निळे असते, तेव्हा पांढरे ढग म्हणजे क्युम्युलस सुंदर दिसतात.
- ढगांचा दुसरा प्रकार म्हणजे स्ट्रॅटस ढग होय. हे ढग एखाद्या चादरीप्रमाणे पसरलेले व पातळ दिसतात.
- तिसरा प्रकार सिरस ढगांचा असतो. हे नाजूक कुरळ्या केसांसारखे किंवा पिसांसारखे दिसतात. त्यांच्यातून पाऊस पडत नाही.
- निम्बस प्रकारचे ढग दाट आणि भुऱ्या रंगाचे असून ते पाऊस देतात.

‘क्युम्युलोनिंबस’ची वैशिष्ट्ये काय? 

आकाशातील बहुतेक ढग विनाशकारी नसतात. विपरीत हवामानाचा ढग एकमेव तो म्हणजे क्युम्युलोनिंबस आहे. काही मिनिटांत हा उंच मनोरा तयार होतो, तसा उंच वाढतो. त्याचा तळ जमिनीवरून एक-दाेन किमी असला तरी त्याचे वरचे टोक १२-१३ किमीपर्यंत किंवा त्याहून वरपर्यंत जाते. त्याच्या खाली काळाकुट्ट व आभाळ भरून आल्याचा अनुभव येतो. जे परवा शिवाजीनगर व पाषाणला दिसले, असे डॉ. केळकर म्हणाले.

ढगांचा जीवनकाळ अर्धा किंवा एक तास

क्युम्युलोनिंबस हा एक वादळी मेघ आहे. तो जर जवळ असेल तर मेघगर्जना ऐकू येते. त्यातील विजेचा लखलखाट आकाशात दूरपर्यंत दिसतो. जमिनीवर वीज कोसळते ती याच ढगांतून. या ढगांचा जीवनकाळ अर्धा तास किंवा एक तास असतो. तेवढ्यात मुसळधार पाऊस येतो. वादळी वारे येतात. - डॉ. रंजन केळकर, माजी महासंचालक, भारतीय हवामानशास्त्र विभाग

या ढगांना क्युम्युलोनिंबस म्हटले जाते

दोन दिवसांपूर्वी शहरातील पाषाणला सायंकाळी काही वेळातच ४६ मिमी, तर शिवाजीनगरला २४ मिमी पाऊस झाला. हा पाऊस कमी वेळेत अधिक पडला. क्युम्युलोनिंबस असे त्या ढगांना म्हटले जाते. त्याने विजांचा कडकडाटासह वादळी वारा येतो. - अनुपम कश्यमी, महासंचालक, भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे

ढगांची नावे व जमिनीवर उंची

क्युम्युलस : १,५०० मीटर

क्युम्युलोनिंबस : ४,०००

सिरस : १५,०००

Web Title: A destructive cloud over the heads of Punekars Hence the heavy rain with gale force winds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.