कौतुकास्पद! पुण्यातील डॉक्टरने नांदेडमधील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला बांधून दिलं घरं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 04:44 PM2022-01-21T16:44:03+5:302022-01-21T16:44:20+5:30
भोई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई यांनी आपली कन्या गायत्रीच्या विवाहानिमित्त नांदेड येथील अर्धापूरमधील लक्ष्मी साखरे यांना स्वत:चे घर बांधून देण्याचा निर्णय घेतला
पुणे: भोई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई यांनी आपली कन्या गायत्रीच्या विवाहानिमित्त नांदेड येथील अर्धापूरमधील लक्ष्मी साखरे यांना स्वत:चे घर बांधून देण्याचा निर्णय घेतला आहे. साचेबद्ध पद्धतीने विवाह न करता कौटुंबिक सोहळ्याला सामाजिक बांधिलकीची जोड देण्याच्या भोई प्रतिष्ठानच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.
डॉ. मिलिंद भोई यांची मुलगी गायत्री भोई हिचा विवाह शनिवारी (दि. २२) हृषिकेश गोसावी यांच्याशी होत आहे. गायत्री आणि हृषिकेश यांच्या विवाहानिमित्त भोई प्रतिष्ठानतर्फे लक्ष्मी साखरे यांना घर बांधून देण्याचा निर्णय घेतला आहे. गोसावी कुटुंबानेही या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अर्धापूर येथे शेतातील झोपडीतून स्वत:च्या नवीन घरात राहायला गेल्यावर या परिवाराच्या चेहऱ्यावर निर्माण होणारा आनंद अनोखा असेल, अशी भावना डॉ. मिलिंद भोई यांनी व्यक्त केली.
नांदेडमधील अर्धापूर येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अनाथ मुलांचे पालकत्व पुण्यातील भोई प्रतिष्ठानतर्फे स्वीकारण्यात आले आहे. यातीलच एक म्हणजे लक्ष्मी साखरे. परिस्थितीचा सामना करत जिद्दीने उभी राहणारी ही माऊली दिवसभर शेतात राबून सायंकाळी मुलांचा अभ्यास घेताना स्वत:चा अभ्यास करत चांगले गुण मिळवून दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाली. त्यांच्या जिद्दीला भोई प्रतिष्ठानतर्फे सलाम करण्यात आला आहे.