प्रभात रोडवरील वीज कट करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांवर सोडला कुत्रा, जिन्यामध्ये ठेवले कोंडून
By विवेक भुसे | Published: September 28, 2023 12:36 PM2023-09-28T12:36:21+5:302023-09-28T12:36:47+5:30
हा प्रकार बुधवारी दुपारी सव्वा तीन ते साडेचार दरम्यान घडला....
पुणे : प्रभात रोडसारख्या सुखवस्तू परिसरात राहणार्या एका कुटुंबाची वीज थकबाकी असल्याने वीज खंडीत करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचार्यांच्या अंगावर कुत्रा सोडण्यात आला. तसेच जिन्यामध्ये डांबून ठेवण्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञ करुणा विजय आढारी यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ललित बोंदे आणि आरती ललित बोंद्रे (रा. सरस्वती अपार्टमेंट, गल्ली नं. ३, प्रभात रोड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी दुपारी सव्वा तीन ते साडेचार दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोंद्रे यांचे सुमारे १० हजार रुपयांचे वीज बिल थकलेले होते. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार फिर्यादी व त्यांचे सहकारी वीज थकबाकी वसुलीचे काम करण्याकरीता गेले होते. त्यांनी बील न भरल्याने फ्लॅटचा वीज पुरवठा खंडीत करण्याचे काम ते करु लागले. तेव्हा पतीपत्नीने त्यांना अर्वाच्य भाषा करुन उद्धटपणे बोलून अंगावर कुत्रे सोडले. जिन्यामध्ये त्यांना डांबून ठेवून सरकारी कर्तव्य पार पाडण्यास अडथळा आणला. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे तपास करीत आहेत.