Ashadhi Wari: आळंदीत जमला वैष्णवांचा मेळा; जाणून घ्या कसा होणार पालखी प्रस्थान सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 12:05 PM2023-06-11T12:05:44+5:302023-06-11T12:06:07+5:30
टाळ - मृदुंगाचा निनाद, ‘ज्ञानेश्वर महाराजांचा अखंड जयघोष’, आणि भगवा झेंडा उंचावत वारकऱ्यांमुळे समस्त अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली
आळंदी : टाळ - मृदुंगाचा निनाद, ‘ज्ञानेश्वर महाराजांचा अखंड जयघोष’, आणि भगवा झेंडा उंचावत फेर - फुगड्यामध्ये देहभान विसरून नाचणाऱ्या वारकऱ्यांमुळे समस्त अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. आज सायंकाळी चार वाजता माउलींच्या पालखी सोहळ्याचे मुख्य मंदिरातून पंढरीकडे प्रस्थान होणार आहे. यापार्श्वभूमीवर प्रस्थान पूर्वीची संपूर्ण तयारी पूर्ण झाल्याची माहिती देवस्थान कमिटीने दिली
श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी सोहळ्यासाठी राज्यासह इतर राज्यातून लाखों भाविकांचा महामेळा अलंकापुरीत जमला आहे. इंद्रायणी घाट, सिध्दबेट, हैबतबाबा पायरी, पुंडलिक मंदिर, नृसिह सरस्वती महाराज मंदिर, संत जलाराम मंदिर, राघवदास महाराज, ज्ञानेश्वर भिंत, साईबाबा मंदिर, गजानन महाराज मंदिर, पद्मावती मंदिर, गोपाळपुरा, विश्रांतवड आदी ठिकाणी भाविकांची गर्दी झाली आहे.
तत्पूर्वी शनिवारी (दि.१०) संत तुकाराम महाराज पालखीच्या प्रस्थानासाठी अनेक वारकरी देहूनगरीकडे मार्गस्थ झाले होते. संत तुकाराम महाराजांचा प्रस्थान सोहळा झाल्यानंतर अनेक वारकरी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रस्थान सोहळ्यात सहभागी होण्यासाठी रात्रीपासून आळंदीत दाखल होत आहेत. त्यामुळे सोमवारी आळंदीत गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
असा असेल प्रस्थान सोहळा
* रविवारी पहाटे ४ वा. घंटानाद. ४.१५ काकडा. पहाटे ४.१५ ते ५.३० पवमान अभिषेक, पंचामृत पूजा व दुधारती. ५ ते सकाळी ९ पर्यंत भक्तांच्या महापूजा व समाधी दर्शन.
* सकाळी ९ ते १२ पर्यंत भाविकांना समाधीस्थळाचे दर्शन व वीणा मंडपात कीर्तन. दुपारी १२ ते १२.३० गाभारा स्वच्छ करणे, समाधीस पाणी घालणे व श्रींना महानैवद्य. दुपारी १२.३० ते २ पर्यंत भाविकांना समाधीचे दर्शन.
* दुपारी २.३० ते ३ वाजता प्रस्थान सोहळ्याच्या मानाच्या ४७ दिंड्यांना मुख्य महाद्वारातून प्रवेश. दरम्यान श्रींना पोशाख घालण्यात येईल.
* सायं. ४ वाजता मुख्य प्रस्थान सोहळ्याला सुरुवात.
* श्रीगुरु हैबतबाबा यांच्या तर्फे श्रींची आरती. त्यानंतर संस्थांची आरती, नारळ प्रसाद व विधिवत मानपानाचा कार्यक्रम.
* माऊलींचे मानाचे दोन्ही अश्व मंदिरात प्रवेश करतील. विणामंडपात पालखीमध्ये श्रींच्या चल पादुका प्राणप्रतिष्ठापित केल्या जातील. दरम्यान संस्थांतर्फे मानकऱ्यांना मानाची पागोटी वाटप करण्यात येईल.
* त्यानंतर पालखी महाद्वारातून प्रस्थान ठेऊन प्रदक्षिणा मार्गाने हा सोहळा आजोळघरी (दर्शनमंडप इमारत) पहिल्या मुक्कामी स्थिरावेल.
* रात्री ११ ते ४.३० जागर.
आळंदीत आरोग्य दिंडी...
ज्ञानेश्वर महाराज आषाढी पालखी सोहळ्यानिमित्त आरोग्य दिंडी काढण्यात आली. पुणे जिल्हा परिषद ,पुणे आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी, ग्रामीण रुग्णालय आळंदी येथील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी दिंडीत सहभागी झाले होते. टाळ, मृदंगाच्या गजरात व ज्ञानोबा - माऊलींच्या जयघोषात या दिंडीने आरोग्य विषयी वारकऱ्यांमध्ये जनजागृती केली. विशेषतः उष्माघात जणजागरण, हिवताप, डेंग्यु, जणजागरण, क्षयरोग, कुष्ठरोग इत्यादी आरोग्य विषयक जोखमीच्या विषयांची फलकांद्वारे माहिती देण्यात आली.