Maharashtra: दुष्काळ जाहीर झाला; मात्र कार्यवाहीबाबत संभ्रम; पंचनामे की सरसकट मदत?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 02:39 PM2023-11-04T14:39:40+5:302023-11-04T14:41:17+5:30
मदत नेमकी केव्हा मिळेल, हे आताच सांगणे अशक्य असल्याचे सूत्रांनी सांगितले....
पुणे : ऑगस्ट महिन्यात पावसाचा २१ दिवसांपेक्षा जास्त खंड; तसेच पीक व मातीतील आर्द्रतेचे परिणाम प्रमाण या निकषांवर राज्यातील राज्यातील १५ जिल्ह्यांमधील २४ तालुक्यांमध्ये गंभीर, तर १६ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे; मात्र ही मदत देताना सासकट द्यावी की पुन्हा पंचनामे करावेत, याबाबत कृषी व महसूल विभाग संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे मदत नेमकी केव्हा मिळेल, हे आताच सांगणे अशक्य असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ऑगस्ट महिन्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड २१ दिवसांपेक्षा जास्त झाला. त्यामुळे पीक उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट आली. त्यामुळे दुष्काळाचा पहिला निकष लागू झाला. त्याचप्रमाणे पीक निर्देशांक व जमिनीतील आर्द्रतेचा निर्देशांक या निकषांचा आधार घेत राज्यातील १५ तालुक्यांमधील ४२ तालुक्यांमध्ये दुष्काळ लागू करावा, यासाठी कृषी आयुक्तांना पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर केलेल्या पडताळणीनंतर कृषी आयुक्तालयाने ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ लागू करावा, अशी शिफारस राज्य सरकारकडे केली. त्यानुसार राज्य सरकारने १५ जिल्ह्यांमधील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यात २४ तालुक्यांमध्ये गंभीर, तर १६ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे.
राज्य सरकारने जारी केलेल्या शासन निर्णयात पिकांचे पंचनामे करावेत, असा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, आता पीक हंगाम संपला आहे. शेतात पिके उभे नाहीत. त्यामुळे पंचनामा कसा करावा, असा प्रश्न राज्यातील सर्व १५ जिल्ह्यांमधील जिल्हा महसूल यंत्रणेला पडला आहे. बागायती क्षेत्रातील पिकांचे पंचनामे कसे करावेत, याबाबतही स्पष्टता नसल्याने हा संभ्रम आणखीनच वाढला आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या शासन निर्णयात सरसकट मदत द्यावी, असा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे मदत कशी द्यावी, याचाही संभ्रम निर्माण झाला आहे. कृषी विभागाने पीक कापणी अहवालानंतर काढलेल्या उंबरठा उत्पादनावर ही मदत द्यावी का, याबाबतही संभ्रम आहे. त्यामुळे याबाबत राज्य सरकारकडून सल्ला घेतल्यावर कार्यवाही सुरू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील बारामती व पुरंदर तालुक्यातील ६१ हजार २५९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून १ लाख ३१० शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. तर शिरूर, इंदापूर व दौंड या तालुक्यांमधील ५२ हजार ४६३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, येथील १ लाख १३ हजार ६८४ शेतकऱ्यांना दुष्काळाची मदत मिळणार आहे.