Pune Crime: बेदम मारहाण केल्याने शेतमजुराची गळफास घेऊन आत्महत्या, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 02:07 PM2024-05-06T14:07:46+5:302024-05-06T14:08:23+5:30

मंचर ( पुणे ) : शेतमजुराला बेदम मारहाण केल्याने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नागापूर येथे घडली आहे. ...

A farm laborer ended himself after being severely beaten, a case has been registered | Pune Crime: बेदम मारहाण केल्याने शेतमजुराची गळफास घेऊन आत्महत्या, गुन्हा दाखल

Pune Crime: बेदम मारहाण केल्याने शेतमजुराची गळफास घेऊन आत्महत्या, गुन्हा दाखल

मंचर (पुणे) : शेतमजुराला बेदम मारहाण केल्याने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नागापूर येथे घडली आहे. याप्रकरणी घनश्याम हरिदास निकम (रा. नागापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. एकनाथ पांडुरंग बर्डे असे आत्महत्या केलेल्या मजुराचे नाव आहे.

पारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल एकनाथ बर्डे यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी रात्री सव्वादहा वाजता बर्डे कुटुंबीय शेतातील खोलीत झोपले होते. त्यावेळी मालक घनश्याम हरिदास निकम हा घरी आला. तो दारूच्या नशेत होता. त्याने आवाज देऊन बर्डे यांना उठवले. घनश्याम निकम याने एकनाथ बर्डे यांना अचानक लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली.

एकनाथ बर्डे यांना हर्निया आजार होता. आजार झालेल्या ठिकाणी मुद्दाम लाथाबुक्कीने मारहाण करण्यात आली. फिर्यादी व त्यांची पत्नी सोनाली, सासू विमल पिंपळे हे भांडणे सोडवत असताना सदर घनश्याम निकम हा त्यांनाही शिवीगाळ करत होता. तुझ्या वडिलांना फाशी देतो मी काही झाले तरी पोलिसांना पैसे देऊन प्रकरण मिटवतो व पुन्हा सहा महिन्यांत बाहेर येतो. अशी धमकी निकम याने दिली. त्यानंतर फिर्यादीचे वडील एकनाथ बर्डे हे घरामध्ये गेले. घनश्याम निकम याने बाहेरून कुलूप लावून घेतले, तर बर्डे यांनी आतून कडी लावून घेतली. घनश्याम निकम हा दरवाजामध्येच बसून होता व बर्डे यांना म्हणत होता तुला सकाळी पाच वाजेपर्यंत जिवंत ठेवत नाही. तुला फाशी देतो असे निकम म्हणत होता.

त्यानंतर फिर्यादी कुटुंबीयासह झोपण्यास गेले. सकाळी एकनाथ बर्डे यांना उठविण्यासाठी आवाज दिला असता आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. बाजूच्या खिडकीतून जाऊन पाहिले असता एकनाथ बर्डे यांनी राहते घराच्या खोलीतील लोखंडी अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेतला होता. फिर्यादीने झालेला प्रकार देवदत्त निकम यांना फोन करून सांगितला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी राहुल एकनाथ बर्डे (मूळ रा. चास पिंपळदरी, सध्या रा. नागापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घनश्याम हरिदास निकम( रा. नागापूर) याच्या विरोधात पारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे करत आहेत.

Web Title: A farm laborer ended himself after being severely beaten, a case has been registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.