शेतकऱ्याला बेदम मारहाण; हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईचा जामीन फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 12:27 PM2023-09-07T12:27:19+5:302023-09-07T12:27:45+5:30
जमीन नावावर करून न दिल्याने एका शेतकऱ्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी धनंजय देसाईला अटक केली होती
पुणे: जमीन नावावर करून न दिल्याने एका शेतकऱ्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेला हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई याचा जामीन जिल्हा आणि सत्र न्यायाधीश व्ही. डी. निंबाळकर यांनी फेटाळला. मुळशीतील दारवली गावात १ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. याबाबत प्रदीप शिवाजी बलकवडे (वय ३५, रा. दारवली, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी पौड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे ॲड. विलास घोगरे पाटील यांनी, तर फिर्यादीतर्फे ॲड. अमेय बलकवडे, ॲड. सतीश कांबळे, ॲड. सूरज शिंदे आणि ॲड. ऋषिकेश कडू यांनी बाजू मांडली. देसाई याच्यावर विविध पोलिस स्टेशनमध्ये तब्बल १७ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये जातीय तेढ निर्माण करणे, खून, हत्यार कायद्यांचे उल्लंघन अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. तलवारी, कोयतेसारखी हत्यारे मिळून आली.
गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घ्यायचा आहे. गुन्ह्यात वापरलेल्या पिस्तुलाचा तपास करायचा आहे. घटना घडल्यानंतर चर्चा करताना देसाई सीसीटीव्हीमध्ये दिसून आला आहे. याचा विचार करून जामीन फेटाळण्याची मागणी सरकारी पक्ष आणि फिर्यादीच्या वकिलांनी केली. घटनेच्या दिवशी बलकवडे गावातील सचिन ठोंबरे यांच्या घरात बसले होते. त्यावेळी देसाईचे साथीदार घरात शिरले. धनंजय देसाई यांच्या नावावर जमीन का करून दिली नाही, अशी विचारणा करून त्यांना धमकावले. जमीन नावावर करून न दिल्यास तुझ्यासह कुटुंबीयांना जिवे मारू, अशी धमकी दिली. बलकवडे यांना एका आरोपीने पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.