पुण्यात रात्री १ वाजता आगीचा भडका, प्रशासनाची उडाली झोप; अग्निशामक गाड्या दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 08:30 AM2023-03-08T08:30:05+5:302023-03-08T09:14:51+5:30
लवकरात लवकर काही प्रमाणात आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु झाला.
पुणे - शहरातील सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी येथील एका फर्निचर दुकानाला मध्यरात्री १ वाजता आग लागली. गेल्या अनेक दिवसापासून हे दुकान बंद अवस्थेतील असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. सिंहगड रस्त्यावरील अग्निशामक दलाच्या एक बंबाने घटनास्थळी तातडीने धाव घेतली. त्यामुळे, लवकरात लवकर काही प्रमाणात आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु झाला.
दुकानातील ही आग गोडाऊनला लागल्याचे लक्षात आले. आगीची दाहकता मोठी असल्याने अग्निशमक दलाच्या आणखी काही गाड्यांना पाचारण करण्यात आले होते. पोलीस आणि स्थानिकांनीही घटनास्थळी धाव घेतली होती. मात्र, मध्यरात्री आग भडकल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. अग्निशामक दलाची चौथी गाडी दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून शटर तोडण्याचे काम सुरू होते.
पोलिसांना विचारले असता अद्याप माहिती घेण्याचं काम सुरु असल्याचे सांगण्यात आले. तसेच, दुकानाचे मालक घटनास्थळी उपस्थित नसल्याने शटर तोडावे लागत आहे, असेही पोलिसांनी सांगितले.
(छायाचित्र - दीपक होमकर, सुर्यकांत बंडगर, संदीप वाघमारे )