Video: चेंबरवर फटाके फोडले अन् स्फोट झाला; २ मुले जखमी, पुण्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 12:32 PM2024-10-29T12:32:34+5:302024-10-29T12:33:29+5:30
लहान मुलांसोबत फटाके वाजवताना त्यांच्यासोबत मोठ्या व्यक्तींनी सोबत राहावे, पोलिसांचे आवाहन
पुणे: सोसायटीतील चेंबरच्या झाकणावर फटाके फोडत असताना चेंबरमधील गॅसचा स्फोट झाल्याने दोन मुले किरकोळ जखमी झाली. चार ते पाच मुले या ठिकाणी फटाके फोडत होती. मानाजी नगर येथील गौरांग रेसिडन्सी येथे सोमवारी (दि. २८) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
चेंबरवर फटाके फोडले अन् स्फोट झाला; २ मुले जखमी, पुण्यातील धक्कादायक घटना#pune#Diwali2024#child#firecrackerspic.twitter.com/7LXFca9aFw
— Lokmat (@lokmat) October 29, 2024
पोलिसांच्या माहितीनुसार, नऱ्हे परिसरातील मानाजीनगर येथील गौरांग रेसिडेन्सीमध्ये चार ते पाच मुले सायंकाळी फटाके फोडत होती. ड्रेनेज लाईनच्या चेंबरवर मुले फटाके फोडत होती. यावेळी फटाक्यामुळे अचानक मोठा स्फोट झाला. ड्रेनेजमध्ये जमा झालेल्या वायूने पेट घेतल्याने हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामध्ये दोन मुले किरकोळ जखमी झाली आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर पोलिसांनी फटाके वाजवताना काळजी घेण्याचे आवाहन नागरिक तसेच मुलांना केले आहे. त्यासोबतच लहान मुलांसोबत फटाके वाजवताना त्यांच्यासोबत मोठ्या व्यक्तींनी सोबत राहावे, असेही म्हटले आहे तर, फटाके वाहनांपासून लांब तसेच लाईट आणि चेंबरपासून दूर अंतरावर वाजवावेत, असे आवाहन केले.