पाच वर्षांच्या मुलीचा स्टीलच्या उलथण्याने चटके देऊन खून; सावत्र आईचा जामीन फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 12:19 PM2023-09-22T12:19:21+5:302023-09-22T12:20:07+5:30
खून केल्याप्रकरणी सावत्र आईचा जामीन न्यायालयाने फेटाळला....
पुणे : पाच वर्षांच्या मुलीला मारहाण करुन तिला स्टीलच्या उलथण्याने चटके देऊन तिचा खून केल्याप्रकरणी सावत्र आईचा जामीन न्यायालयाने फेटाळला.
या प्रकरणात सावत्र आईसह वडिलांवरही भा.दं.वि कलम ३०२, १८२ सह बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम २००० चे कलम २३ नुसार उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावत्र आई मुलीला मारहाण आणि चटके देताना दिसत असूनही वडिलांनी विरोध केला नाही आणि दुर्लक्ष करून हलगर्जीपणा केला. म्हणून वडिलांनाही आरोपी करण्यात आले आहे.
ही घटना 23 फेब्रृवारीला सकाळी ९:३० ते दुपारी १:३० च्या सुमारास घडली. दरम्यान, सावत्र आईने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी जामिनाला विरोध केला. या गुन्ह्यातील महत्त्वपूर्ण साक्षीदार हे आरोपी राहतात त्या घराच्या शेजारी राहत असून, आरोपीस जामीन झाल्यास साक्षीदारांवर आरोपीकडून दबाव येण्याची शक्यता आहे. यातच घटनेच्या वेळी आरोपी व मयत मुलगी घरातच होते. आरोपी महिला व्हॉट्सॲपद्वारे आपल्या पतीला (मयत मुलीच्या वडिलांना) मयत मुलगी त्रास देत असल्याबाबत सतत तक्रार करीत असे. ते व्हॉट्सॲप चॅट आरोपीच्या मोबाइलमधून जप्त करण्यात आले. आरोपीला मयताच्या सतत होणाऱ्या त्रासापासून सुटका व्हावी असे वाटत होते. तोच गुन्ह्याचा हेतू आहे. आरोपी महिलेला जामीन दिल्यास आरोपी महत्त्वाच्या पुराव्यांमध्ये छेडछाड करू शकते, असा युक्तिवाद ॲड. अगरवाल यांनी केला. न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद मान्य करीत आरोपी महिलेचा जामीन फेटाळला.