Maharashtra Assembly Election 2024 : जिल्ह्यात मतदारांच्या सेवेत ४० हजार अधिकाऱ्यांचा ताफा
By नितीन चौधरी | Published: November 19, 2024 01:14 PM2024-11-19T13:14:23+5:302024-11-19T13:16:11+5:30
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज : मतदान केंद्रे ८,४६२ अन् ईव्हीएम संख्या १३,६९४
पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (दि. २०) मतदान हाेत आहे. यादृष्टीने जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील २१ मतदारसंघांमध्ये तब्बल ३०३ उमेदवार रिंगणात आहेत. दुसरीकडे ४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या पात्र मतदारांची संख्या एकूण ८८ लाख ४९ हजार ५९० इतकी आहे. त्यात ४५ लाख १९ हजार २१६ पुरुष, तर ४२ लाख ६९ हजार ५६९ महिला मतदार आहेत. शिवाय ८०५ तृतीयपंथी मतदार आहेत.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्ह्यात ८,४६२ मतदान केंद्रे आहेत. त्यासाठी १३ हजार ६९४ मतदान यंत्रे अर्थात ईव्हीएम देण्यात आली आहेत. तसेच १० हजार १४४ कंट्रोल युनिट आणि १० हजार ९९३ व्हीव्हीपॅट यंत्रे देण्यात आली आहेत. या सर्व मतदान केंद्रांवर ९ हजार ३०८ केंद्राध्यक्ष, ९ हजार ३०८ प्रथम मतदान अधिकारी व १२ हजार २३ अतिरिक्त मतदान अधिकारी असे एकूण ३९ हजार ९४८ अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
अपक्ष उमेदवारांची संख्या १६१
जिल्ह्यातील २१ मतदारसंघांमध्ये सर्वाधिक १३ उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे असून, त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे १२ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे ९ उमेदवार, तर शिवसेना आणि काँग्रेसचे प्रत्येकी ५ उमेदवार निवडणूक लढत आहेत. यावरून जिल्ह्यात खरी लढत शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच आहे. शिवसेनेच्या शिंदेगटाचा केवळ एक उमेदवार रिंगणात आहे. बसपने मात्र, १४ ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. भोर व मावळ मतदारसंघात प्रत्येकी २ अपक्ष उमेदवार असले तरी उर्वरित १९ मतदारसंघांमध्ये १५९ अपक्ष असून एकूण अपक्षांची संख्या १६१ इतकी आहे. जिल्हाभरात सर्व मतदारसंघांमध्ये केवळ २१ महिला उमेदवार रिंगणात आहेत.
वयाेगटनिहाय जिल्ह्यातील मतदारसंख्या किती?
वयाेगट - मतदारसंख्या
१८ ते १९ - १ लाख ७८ हजार ६१५
२० ते २९ - १५ लाख ६१ हजार ३५४
३० ते ३९ - २२ लाख ५ हजार ६१३
४० ते ४९ - १९ लाख ५३ हजार ९०४
५० ते ५९ - १३ लाख ३८ हजार ५९८
६० ते ६९ - ८ लाख ६६ हजार ९५
७० ते ७९ - ४ लाख ९९ हजार ३५७
८० ते ८९ - १ लाख ९४ हजार २३६
९० ते ९९ - ४६ हजार ५८६
१०० ते १०९ - ५ हजार २१६
११० ते ११९ - १२
१२० पेक्षा जास्त - ४
सुमारे २ हजार अनिवासी भारतीय मतदार
जिल्हा निवडणूक शाखेकडून तयार करण्यात येणाऱ्या मतदार यादीत सामान्य, सेवा तसेच अनिवासी भारतीय मतदारांची नावे समाविष्ट केली जातात. या तिन्ही प्रकारातील मतदारांची स्वतंत्र यादी तयार केली जाते. त्यानुसार जिल्ह्यात सुमारे २ हजार अनिवासी भारतीय मतदार आहेत. त्यात सर्वाधिक ३५५ मतदार चिंचवड मतदारसंघात असून, शहरात अपेक्षेनुसार कोथरुड मतदारसंघात २७२ अनिवासी भारतीय मतदार आहेत. या मतदारांना अन्य सामान्य मतदारांसारखे प्रत्यक्ष हजर राहून मतदान करता येते.
४ हजार ८०२ दृष्टीहिन मतदार
जिल्ह्यात एकूण ४ हजार ८०२ दृष्टीहिन मतदार आहेत. सर्वाधिक ८३६ मतदार वडगाव शेरी मतदारसंघात असून, सर्वांत कमी ९ मतदार हडपसर मतदारसंघात आहेत.
७५६ सहकारी संस्थांमध्ये हेल्प डेस्क
जिल्हा प्रशासनातर्फे समाजातील सर्व घटकांना लोकशाहीच्या या उत्सवात सामील करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांनी पुढाकार घेतला आहे. शहरातील ७५६ सहकारी गृहनिर्माण संस्थांनी हेल्प डेस्क सुरू केले आहेत. या माध्यमातून सोसायटीतील मतदारांना मदत केली जात आहे.
९८ ठिकाणी सहापेक्षा जास्त मतदान केंद्रे
शहरात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. मतदार जनजागृती सोबतच मतदान केंद्रांवर दिल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी महापालिकांनीही युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील ९८ ठिकाणी सहा किंवा सातपेक्षा जास्त मतदान केंद्रे आहेत. या सर्व मतदान केंद्रांवर एकूण मतदारांची संख्या मतदार यादीनुसार सुमारे दहा हजारांच्या घरात आहे. किमान ६० टक्के मतदान झाले असे गृहीत धरले तरी दिवसभरात किमान ६ हजार मतदार या ठिकाणी जमणार आहेत. हे मतदान केंद्र एकतर महापालिकांच्या शाळा किंवा सरकारी इमारतींमध्ये असून त्या ठिकाणी मतदारांना ये-जा करण्यासाठी जास्तीतजास्त गेट असावेत, अशी सूचना सर्व संबंधितांना करण्यात आली आहे.
३८ मतदान केंद्रांवर ‘रनर’
जिल्ह्यातील डोंगरात वसलेल्या गावांत अजूनही मोबाईल नेटवर्क किंवा अन्य दळणवळणाची सुविधा पोहाेचली नसल्याने अशा ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रांसाठी रनर अर्थात निरोप्याची सोय करण्यात येणार आहे. दर दोन तासाला घेण्यात येणाऱ्या मतदानाची आकडेवारी हे रनर या मतदान केंद्रांमधून नेटवर्क असलेल्या ठिकाणी आणून देण्याचे काम करणार आहेत. जिल्ह्यातील तीन मतदारसंघांमधील ३८ मतदान केंद्रांवर ही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यात खेड आळंदीमधील ५, भोरमधील ३० व आंबेगावमधील ३ गावांचा समावेश आहे.
१३ हजार सीसीटीव्ही करणार देखरेख
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, लोकसभा निवडणुकीत राज्यातील ५० टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग अर्थात कॅमेऱ्यांची नजर ठेवण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीतही वेबकास्टिंग केले जाणार आहे. मात्र, शहरी भागातील ११ मतदारसंघांतील सर्व मतदान केंद्रांवर, तर ग्रामीण भागातील १० मतदारसंघांतील निम्म्या मतदान केंद्रांवर प्रत्येकी दोन कॅमेरे असतील. त्यानुसार जिल्ह्यातील ८ हजार ४६२ मतदान केंद्रांवर सुमारे तेरा हजार कॅमेरे लावण्यात आले आहेत. पुणे व पिंपरीतील ११ मतदारसंघांमधील ४ हजार ४९४ मतदान केंद्रांवर सर्व ठिकाणी प्रत्येकी दोन असे एकूण ८ हजार ९८८ कॅमेरे लावले आहेत. त्यात पुणे शहरातील वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, पर्वती, हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट, कसबा पेठ; पिंपरी शहरातील पिंपरी, चिंचवड व भोसरी मतदारसंघाचा समावेश आहे. ग्रामीण भागातील १० मतदारसंघांमधील एकूण ३ हजार ९६८ मतदान केंद्रांपैकी १ हजार ९८० केंद्रांवर प्रत्येकी दोन कॅमेरे असे एकूण ३ हजार ९६८ लावण्यात आले आहेत. वेबकास्टिंग होत असेलल्या मतदान केंद्रावर एक कॅमेरा आत, तर एक कॅमेरा बाहेर असेल. त्यानुसार जिल्ह्यात १२ हजार ९४८ कॅमेरे लावण्यात आले आहेत.
रांगांचे व्यवस्थापन करण्याच्या सूचना
लोकसभा निवडणुकीवेळी मुंबईत मतदान संथगतीने झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या तसेच पुण्यातही काही मतदान केंद्रांवर ही स्थिती होती. याची गांभीर्याने दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींनी पुणे शहरात मतदान केंद्रांवरील लागणाऱ्या रांगा कमी करण्यासाठी मतदान केंद्रात एकाच वेळी एका मतदाराऐवजी चार मतदारांना प्रवेश द्यावा, त्यानुसार केंद्रावरील रांगांचे व्यवस्थापन करा, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
क्यूआर कोड स्कॅन करा अन् मतदानाचे ठिकाण शाेधा..!
विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनाने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. विधानसभेचे २१ मतदारसंघ तसेच मतदारांच्या संख्येत राज्यातील सर्वात मोठा जिल्हा असल्याने मतदानाच्या १५ दिवस आधीच मतदार चिठ्ठ्यांचे वाटप सुरू केले आहे. या चिठ्ठ्यांवर मतदान केंद्राच्या ठिकाणाचा क्यूआर कोड असून नवमतदारांना तसेच शहरी भागात नव्याने स्थलांतरित झालेल्या मतदारांना आपले मतदान केंद्र शोधणे सोपे होणार आहे.
२९ मतदान केंद्राच्या जागेत बदल
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ८ मतदारसंघात ४५ नवीन साहाय्यकारी मतदान केंद्र तयार केले आहेत. तर १० विधानसभा मतदारसंघात ५३ मतदान केंद्राच्या नावात आणि २९ मतदान केंद्राच्या जागेत बदल करण्यात आला आहे. सर्वाधिक ११ मतदान केंद्र वडगाव शेरी, तर हडपसरमध्ये ७ मतदान केंद्र वाढली आहेत.
१४ मतदारसंघांमध्ये केवळ एकच ईव्हीएम
अर्ज माघारीनंतर जिल्ह्यातील लढतींचे चित्र स्पष्ट झाले असून, ७ मतदारसंघांमध्ये १५ पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे या ठिकाणी दोन मतदान यंत्र अर्थात ईव्हीएम लावले जाणार आहेत. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी २१ मतदारसंघांमध्ये १७९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने ३०३ उमेदवार रिंगणात उरले आहेत. निवडणुकीत एका मतदान यंत्रावर १५ उमेदवार अधिक एक नोटा असे १६ बटण असतात. सर्वात शेवटी नोटाचे बटण असते. त्यामुळे १४ मतदारसंघांमध्ये केवळ एकच ईव्हीएम अर्थात मतदान यंत्र लावले जाणार आहे. तर पुणे कँटोन्मेंट, हडपसर, वडगाव शेरी, चिंचवड, पुरंदर, इंदापूर व बारामती या मतदारसंघांमध्ये उमेदवारांची संख्या १५ पेक्षा जास्त असल्याने दोन ईव्हीएम लावले जाणार आहेत. पुंरदर व वडगाव शेरीत प्रत्येकी १६ उमेदवार रिंगणात असल्याने येथे दुसऱ्या मतदान यंत्रावर केवळ नोटाचे बटण असेल.
१२ मतदारसंघात केंद्रीय सशस्त्र पोलीस बल
खेड आळंदी, शिरूर, दौंड, बारामती, मावळ, चिंचवड, पिंपरी, वडगाव शेरी, शिवाजीनगर, पर्वती, हडपसर, पुणे कँटोन्मेंट या १२ विधानसभा मतदारसंघांमध्ये रोख रक्कम, अमली पदार्थ तसेच भेटवस्तू वाटण्याचे प्रमाण तसेच उमेदवारांच्या खर्चाचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले. त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने नेमलेल्या निवडणूक खर्च निरीक्षकांनी यावर अधिक बारकाईने नियंत्रण ठेवण्यासाठी या मतदारसंघांमध्ये स्थिर तसेच भरारी पथक वाढविण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक यंत्रणेला दिले होते. तसेच या मतदारसंघांमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस बल तैनात करण्याचे निर्देशही दिले होते. त्यानुसार या मतदारसंघांमध्ये प्रत्येकी तीन स्थिर व भरारी पथकांची संख्या वाढविण्यात आली आहे.
चोख सुरक्षा व्यवस्था
जिल्ह्यात संवेदनशील मतदान केंद्रावर २४ बाय ७ एकात्मिक नियंत्रण कक्ष, संवेदनशील बुथमध्ये वेबकास्टिंग, पुरेसा सशस्त्र पोलिस बंदोबस्त, प्रतिबंधात्मक कार्यवाही, संपूर्ण जिल्ह्यात चेकपोस्टचे जाळे आणि सूक्ष्म निरीक्षक तैनात करण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे.
...तर येथे करा तक्रार
शहरात कुठेही आचारसंहितेचे उल्लंघन होत असेल तर नागरिकांनी तेथील छायाचित्र किंवा चित्रफीत काढावी आणि तत्काळ सी-व्हिजिल ॲपवर अपलोड करावे किंवा जिल्हा नियंत्रण कक्षाकडे आणि १८००२३३०१०२ आणि १९५० टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहनही जिल्हा निवडणूक कार्यालयाने केले आहे.
लोकसभा निवडणूक शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. मतदान केंद्रापासून १०० मीटर परिघात मतदारांना मोबाईल नेता येणार नाही. मतदान केंद्रात छायाचित्र, छायाचित्रण करण्यास प्रतिबंध आहे. असे प्रकार आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल. निवडणुकीमध्ये सर्व मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदवून मतदान करावे, लोकशाही मजबूत करण्यासाठी सहकार्य करावे.
- डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी